परभणी : येथील रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला असून अज्ञात व्यक्तीने रेल्वे मालमत्तेची तोडफोड करत ड्युटीवरील कर्मचाऱ्यावरच हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना रविवारी (दि.५) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या या स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वरील लिफ्ट परिसरात हा प्रकार घडला.संबंधित व्यक्तीने प्रथम लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक तोडला आणि त्यानंतर लिफ्टमध्ये बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा तोडफोड करून नुकसान केले. दरम्यान, ही बाब ड्युटीवर असलेल्या इलेक्ट्रिकल मेंटेनन्स कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तो व्यक्ती आक्रमक झाला. शिवीगाळ करत त्याने कर्मचाऱ्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही क्षण गोंधळ उडाला. तथापि, परिस्थिती गंभीर असतानाही संबंधित कर्मचाऱ्याने धाडस दाखवत त्या व्यक्तीचा फोटो काढण्यात यश मिळवले. तसेच इतर इलेक्ट्रिकल कर्मचारी आणि आरपीएफ यांना तात्काळ माहिती देण्यात आली. मात्र, अतिरिक्त कर्मचारी आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी तेथून पसार झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या पाहणीत लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. संबंधित व्यक्तीवर रेल्वे मालमत्तेचे नुकसान आणि कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, रेल्वेस्थानक परिसरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा आणि देखरेख वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नुकसान झालेल्या लिफ्टचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेरा तात्काळ दुरुस्त अथवा बदलण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, प्रवासी सुविधांचा जबाबदारीने वापर करावा व रेल्वे मालमत्तेचे नुकसान होईल, असे कोणतेही कृत्य टाळावे. तसेच अशा प्रकारच्या घटना आढळल्यास तात्काळ प्रशासन किंवा आरपीएफला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासी, कर्मचारी आणि रेल्वे मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.