Young Man Dody found in Purna
पूर्णा : पूर्णा शहराबाहेरील चुडावा - पूर्णा मुख्य रस्त्यावरील धनगर टाकळी गाव फाट्याजवळील पूर्वेकडील एका पडीक जागेत, विटांच्या कंपाऊंड भिंतीमागे, युवकाचा गळा चिरलेला मृतदेह आज ( दि. १२) सकाळी आढळून आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनास्थळाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, चुडावा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, पोलीस उपनिरीक्षक अरुण मुखेडकर, जमादार प्रभाकर कच्छवे तसेच पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व एपीआय गजानन पाटील हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन लॅब पथकाला पाचारण करून घटनास्थळाची कसून तपासणी सुरू केली आहे. ही घटना ११ ऑगस्टच्या रात्री घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामा व पाहणी पूर्ण झाल्यानंतर चुडावा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली जाणार आहे.
पोलिसांनी मृताची ओळख पटवली आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील वाणी पिंपळगाव येथील रोहिदास विक्रम शेवाळे (वय २६) असे मृताचे नाव आहे. मृतदेह पूर्णा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे. रोहिदास शेवाळे याचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला, याचा उलगडा तपासानंतर होणार आहे. घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.