Purna Lasina canal water issue
आनंद ढोणे
पूर्णा : तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारातून जाणारा येलदरी–सिद्धेश्वर धरणाच्या पूर्णा प्रकल्पातील लासिना कालवा या वर्षी रब्बी हंगामाच्या मध्यावर येऊनही कोरडाच आहे. खरीपात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही धरणे शंभर टक्के भरली असतानाही वसमत विभागाच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांनी अद्याप कालव्याला पाणी पाळ्या सुरू केल्या नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सुहागन, पांगरा, बरबडी, आडगाव, नं.-हापूर, पिंपळगाव लिखा, सोन्ना, गौर, गोविंदपूर, चूडावा, कावलगाव, सातेफळ या गावांतील कालवा लाभार्थी शेतकरी अनेक दिवसांपासून पाण्याची प्रतीक्षा करीत आहेत. खरीपातील अतिवृष्टीने पिके हातची गेल्यानंतर शेतकऱ्यांची अंतिम आशा रब्बीवर होती; मात्र अर्धा रब्बी हंगाम उलटूनही कालव्यात पाणी न आल्याने गहू, हरभरा व इतर हंगामी पिकांवर संकट आले आहे.
पाटबंधारे विभागाने कालव्यातील गाळ काढण्याचे कामही वेळेत न करता मोठा विलंब लावल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. काहीच ठिकाणचा गाळ काढून काम बंद करण्यात आल्याने “गाळ काढणी पूर्ण झाली असे म्हणताय, पण मग पाणी का सोडत नाही?” असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांकडून मात्र शेतकऱ्यांनी पाणी पाळ्यासाठी अर्ज दिले नाहीत, असे कारण सांगितले जात आहे. परंतु धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असताना पाण्याचा उपयोग केला जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
पाच दिवसांत लासिना कालव्यात पाणी न सोडल्यास पाटबंधारे विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.- प्रकाशराव पाटील, शेतकरी नेते
अस्मानी–सुलतानी संकटाचा दुहेरी फटका
यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीने खरीपाची पिके पूर्णपणे नष्ट झाली. आता धरणे भरलेली असूनही कालवा कोरडा असल्याने सुलतानी संकटामुळे रब्बी हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी हातावर पोट असताना पाटबंधारे खात्याची निष्क्रियता ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.