पूर्णा : रब्बीचा हंगाम जोमात असतानाच पूर्णा शहरातील मोंढा परिसरात युरिया खताचा मोठा तुटवडा भासत आहे. मात्र, हा तुटवडा नैसर्गिक नसून व्यापाऱ्यांनी निर्माण केलेली 'कृत्रिम टंचाई' असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. चढ्या दराने खत विक्री आणि सोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.
नेमका प्रकार काय?
यंदा अतिवृष्टीमुळे पाण्याचे स्त्रोत मुबलक असल्याने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. या पिकांच्या वाढीसाठी युरियाची अत्यंत गरज आहे. मात्र, कृषी सेवा केंद्रांवर गेल्यावर "रॅक लागली नाही" किंवा "स्टॉक संपला आहे" अशी उत्तरे दिली जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जादा पैसे देण्याची तयारी दर्शवल्यास किंवा ओळखीचा संदर्भ असल्यास मागच्या दाराने खताच्या गोण्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष?
कृषी दुकानदारांच्या या मनमानी कारभाराकडे स्थानिक, कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. ऐन गरजेच्यावेळी खत मिळत नसल्याने पिकांचे उत्पादन धोक्यात आले आहे. "आमच्या समस्या सोडवायला कोणालाच वेळ नाही का?" असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे. साठेबाजी करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करून पूर्णा परिसरात मुबलक युरिया उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.