Purna Rabi Crop Damage
पूर्णा : तालुक्यातील पांगरा, मरसूळ, वाई, पिंपळा, लोणधार, चुडावा परिसरात सोमवारी ( दि. ३) दुपारी सुमारे दीड वाजल्यापासून जवळपास तासभर अवकाळी पावसाचा जोरदार मारा झाला. गेल्या चार दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या या अवेळी पावसामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पावसाने खरीप हंगाम अक्षरशः उद्ध्वस्त केला. आता रब्बी पेरणीचा काळ सुरू असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे हाल आणखी वाढले आहेत. खरीप गेल्यामुळे रब्बीतून नुकसान भरून काढण्याची आशा असलेल्या शेतकऱ्यांना आता निराशा हाताशी लागली आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात वाहून गेली. काहींनी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा मार्गही स्वीकारला. खरीपात झालेल्या नुकसानीनंतर रब्बी हंगामही अवकाळी पावसामुळे धुसर होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सरकारकडून मदत आणि अनुदानाच्या घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात मिळणारी मदत तुटपुंजी आहे. अनेक शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टी अनुदान मिळालेले नाही. त्यातच प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईचा लाभ देखील बहुतेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
पूर्णा तालुक्यात महसूल, कृषी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी संयुक्तरित्या ३६ ठिकाणी सोयाबीन पिकाच्या उत्पादन चाचण्या घेतल्या. मात्र, उत्पादन अत्यल्प असूनही विमा भरपाई कधी मिळणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे पीकविम्यासाठी पैसे भरूनही शेतकऱ्यांना काहीच हमी नाही, अशी स्थिती आहे.
खरीप हातचा गेल्यानंतर रब्बीवर विसंबून राहिलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हवालदिल केले आहे. “जगावं की मरावं?” असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.