वनस्पती विकृती तज्ज्ञ दरडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी संतोष भालेराव, उपकृषी अधिकारी शिंदे, प्रविण काळे, एच. एस. मोरे तसेच महाबीजचे प्रतिनिधी खांडेभराड यांनी शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली Pudhari
परभणी

Parbhani News | तरंगल शिवारातील ज्वारी पिकाची कृषी शास्त्रज्ञांकडून पाहणी; ‘दै. पुढारी’तील वृत्ताची दखल

ज्वारीच्या काही कणसांवर लांबकाणी व काळी गोसावी या रोगांचा प्रादुर्भाव

पुढारी वृत्तसेवा

Purna Tarangal Jowar crop

पूर्णा : तालुक्यातील तरंगल शिवारात रब्बी हंगामात शेतकरी अनंत ढोणे यांनी सुमारे दोन एकर क्षेत्रात महाबीज बियाण्यांद्वारे ज्वारीची पेरणी केली होती. या पिकाची वाढ चांगली झाली असली तरी काही कणसांवर लांबकाणी व काळी गोसावी या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला.

या संदर्भात २० मार्च २०२६ रोजी ‘दै. पुढारी’मध्ये “ज्वारी कणसाला कान्ही उत्पत्ती; बियाण्याविषयी प्रश्नचिन्ह” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत २७ मार्च रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ज्वार संशोधन केंद्रातील वनस्पती विकृती तज्ज्ञ दरडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी संतोष भालेराव, उपकृषी अधिकारी शिंदे, प्रविण काळे, एच. एस. मोरे तसेच महाबीजचे प्रतिनिधी खांडेभराड यांनी शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान शास्त्रज्ञ दरडे यांनी सांगितले की, ज्वारीतील लांबकाणी व काळी गोसावी हे रोग अनुक्रमे स्पोरीस्पोरियम रेयीलियाना आणि टोलिपोस्पोरियम एह्रेनबर्गी या बुरशींमुळे होतात. विशेषतः स्थानिक जातींमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो. काळी गोसावी रोग जमिनीद्वारे पसरतो व त्यामुळे कणसातील दाणे भरण्याऐवजी त्याचा आकार बदलून काळ्या केसांसारखा गुच्छ तयार होतो. तर लांबकाणी रोग फुलोऱ्याच्या अवस्थेत बाधा आणतो व त्याचा प्रसार प्रामुख्याने हवेद्वारे होतो.

रोग व्यवस्थापनासाठी उपाययोजना :

काळी गोसावी रोग नियंत्रणासाठी शेतातील बाधित झाडे त्वरित उपटून प्लास्टिकच्या पिशवीत गोळा करून शेताबाहेर जाळून नष्ट करावीत. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पिकांची फेरपालट करावी तसेच काढणीनंतर खोल नांगरणी करावी.

लांबकाणी रोग नियंत्रणासाठी बियाणे पेरणीपूर्वी प्रक्रिया करणे उपयुक्त ठरते. एक किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक भुकटी किंवा ३ ग्रॅम झायरम बुरशीनाशक वापरावे. तसेच पी.जे. ७ के आणि पी.जे. २३ के या रोगप्रतिकारक वाणांची निवड करावी, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT