Crop Insurance Company Dispute Pudhari
परभणी

Crop Insurance | खरीप पीकविमा भरपाई तुटपुंजी देण्याचा विमा कंपनीचा घाट; स्वाभिमानी संघटना लढा उभारणार

मागील खरीप हंगामातील सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Purna Tehsil Kharif Insurance

आनंद ढोणे
पूर्णा:
तालुका परिसरात खरीप हंगाम २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जोखीम पत्करून असंख्य शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे मोठ्या रकमेचा प्रिमियम भरला होता.

मागील खरीप हंगामातील सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराचे पाणी शेतात शिरून पिकांसह जमिनीचेही मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी माती वाहून गेली. उर्वरित क्षेत्रातील पिकांनाही मोठा फटका बसून उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट नोंदवण्यात आली.

कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या वतीने पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. सहा मंडळांमध्ये रँडम पद्धतीने निवडलेल्या प्लॉटवर सोयाबीन कापून उत्पादनाचे सरासरी मूल्य काढण्यात आले. काही ठिकाणी सोयाबीन दाण्यांमध्ये ओलावा आढळल्याचे विमा कंपनीने नमूद केले. त्यानंतर ओलावा वाळवून उत्पादन क्षमता कमी धरल्याचे सांगण्यात आले.

यासोबतच उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती, मागील पाच ते सात वर्षांचे उंबरठा उत्पादन आदी निकषांच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित करण्यात येत आहे. पीक कापणी प्रयोगांनुसार नुकसान मोठे दिसून येत असतानाही कृषी बाजारपेठ, मंडी आणि नाफेडच्या खरेदीतील आकडे तसेच सॅटेलाईट अहवालांमुळे पिके चांगली असल्याचे गृहीत धरले जात असल्याने भरपाई अत्यंत कमी निश्चित केली जात असल्याचा आरोप होत आहे.

या सर्व प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या हाती अत्यल्प नुकसान भरपाई येत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, विमा कंपनीकडून जाणीवपूर्वक तुटपुंजी भरपाई देण्याचा प्रयत्न होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

परिणामी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला असून ही योजना फसवी ठरत असल्याची भावना वाढीस लागली आहे. भविष्यात या योजनेत सहभागी होणार नाही, अशीही भूमिका शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे.

पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा हप्ता गोळा केला जातो. मात्र अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना ८०० ते १२०० रुपये इतकीच भरपाई मिळत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्त्यांनी यावर मौन बाळगणे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच लढा उभा करणार आहे.
- किशोर ढगे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना (परभणी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT