पांगरा शिवारातातील शेतात पाहणी करताना भूजल सर्वेक्षणचे अधिकारी आणि ग्रामस्थ (Pudhari Photo)
परभणी

Purna News | पांगरा शिवारात जमिनीतून निघणाऱ्या धुरामागे भूवैज्ञानिक कारण स्पष्ट; नागरिकांनी चिंता करू नये

Parbhani News | नरहरी परसराम पावडे यांच्या शेतातून अचानक धूर निघत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता पसरली होती

पुढारी वृत्तसेवा

Pangra village smoke from ground

पूर्णा : तालुक्यातील पांगरा लासीना येथील शेतकरी नरहरी परसराम पावडे यांच्या गट क्रमांक 102 मधील शेतातून गेल्या काही दिवसांपासून अचानक धूर निघत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी ही माहिती नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना दिली. त्यांनी तत्काळ परभणी येथील भूवैज्ञानिक खात्याला कळविले.

याबाबतची बातमी 'दै. पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, परभणी येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची टीम आज (दि13) सकाळी 10:30 वाजता घटनास्थळी दाखल झाली. या टीममध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. सी. डी. चव्हाण आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक अंजुम कुरणे सहभागी होते.

वैज्ञानिक तपासणी व निष्कर्ष

तपासणीदरम्यान आढळले की, जमिनीखाली तीन ते पाच फूट अंतरावर उष्ण चुनखडीयुक्त खडक आहेत. उष्णतेमुळे हे खडक तापतात आणि पावसाचे पाणी त्यांच्याशी संपर्कात आल्यावर बाष्पीभवन होऊन जमिनीच्या पृष्ठभागावर वाफेसारखा धूर बाहेर पडतो. हा प्रकार पूर्णपणे नैसर्गिक असून त्यातून मानवाला कोणताही धोका नाही, असा प्राथमिक निष्कर्ष तज्ज्ञांनी दिला.

ग्रामस्थांनी घाबरू नये

या नैसर्गिक खनिज प्रक्रियेमुळे अधूनमधून धूर दिसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले. जर पुढील काळात धुराचे प्रमाण लक्षणीय वाढले, तर त्याची सखोल तपासणी केली जाईल. सध्या मात्र हा प्रकार धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाले असून, शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT