सरपंच उत्तमराव ढोणे पाटील, जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट आणि माजी सभापती बालाजी देसाई यांनी कुटुंबाला मदतीचा हात दिला. Pudhari
परभणी

Purna Cattle Attack | पांगरा पशुधन हल्ल्यातील दुसरी गंभीर जखमी म्हैसही दगावली

पशुधन हत्याकांडाने परभणी जिल्हा हादरला; शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान, आरोपी अद्याप फरार

पुढारी वृत्तसेवा

Injured Buffalo Dies Pangra Purna

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील पांगरा-बरबडी शिवरस्त्यालगत असलेल्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या पशुधनावर अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी शस्त्रांनी केलेल्या अमानुष हल्ल्यातील दुसरी जखमी म्हैसही मृत्युमुखी पडली आहे. मंगळवारी दुपारी एक लाख ५० हजार रुपये किमतीची म्हैस दगावल्यानंतर त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास एक लाख ८० हजार रुपये किमतीच्या दुसऱ्या म्हशीचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी आनंदा नागोराव ढोणे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

२४ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोठ्यात बांधलेल्या पशुधनावर हल्ला केला होता. जनावरांच्या मस्तकावर लोखंडी रॉडने प्रहार करण्यात आले, तर काही जनावरांच्या गुप्तांगात लोखंडी रॉड खुपसल्याचे समोर आले होते. या क्रूर हल्ल्यात दोन जनावरे जागीच मृत्युमुखी पडली होती, तर अन्य गाय आणि म्हशी गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचार सुरू असतानाच दोन जखमी म्हशींचाही मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, पशुधनावर झालेल्या अमानुष हल्ल्याची चर्चा संपूर्ण परभणी जिल्ह्यात सुरू आहे. घटनेला चार दिवस उलटूनही फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी तक्रारदारासह शेतकरी वर्गातून होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

या घटनेमुळे आनंदा नागोराव ढोणे आणि कमलाबाई आनंद ढोणे यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. पशुधनाच्या नुकसानीमुळे कुटुंबाला आर्थिक फटका बसला असून, कुटुंबीयांचे अश्रू अनावर होत आहेत. त्यांना धीर देण्यासाठी परिसरातील शेतकरी, नातेवाईक, मित्रमंडळी आणि काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सरपंच उत्तमराव ढोणे पाटील, जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट आणि माजी सभापती बालाजी देसाई यांनी कुटुंबाला मदतीचा हात दिला.

लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवरून नाराजी

पशुधनावर झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झाले असताना, त्यांना धीर देण्यासाठी मोठे लोकप्रतिनिधी अद्याप घटनास्थळी आले नसल्याची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. शेतकरी हिताच्या घोषणा करणारे पालकमंत्री, खासदार आणि आमदार या घटनेपासून दूर का आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून पीडित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT