पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा पंचायत समिती कार्यालयांतर्गत असलेल्या लेखा विभागात सुमारे १ कोटी ८४ लाखांचा अपहार झाला. या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यातील २ प्रमुख आरोपींना पूर्णा पोलिसांनी ४८ तासांच्या आत गजाआड केले. त्यांना आज (दि.९) पूर्णा न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पूर्णा पंचायत समिती कार्यालयांतर्गत १ अक्टोबर २०२१ ते मे २०२३ पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन तसेच भविष्य निर्वाह निधी योजनेमध्य तत्कालीन दोन गटविकास अधिकारी तसेच लेखापाल व काही कर्मचारी आणि खासगी व्यक्ती अशा नऊ जणांनी पेन्शन धारकांच्या १ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. सन २०२४ मध्ये पंचायत समितीच्या जि. प. स्थानिक लेखा परिक्षणानंतर उघडकीस आले होते. याची कूणकूण लागताच 'दै. पुढारी'ने याबाबतचे वृत्तही प्रसिद्ध केले होते. दरम्यान, संबंधित विभागाने दोषींवर चौकशी करून कारवाई करण्याचे सांगितले होते. अखेर ३ महिन्यानंतर विद्यमान गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड यांनी मंगळवारी (दि.७) तक्रार दाखल केली होती.
पंचायत समितीमधील सहाय्यक लेखा अधिकारी एस. के. पाठक, वरिष्ठ सहाय्यक एम. बी. भिसे, तत्कालीन बीडीओ एस. के. वानखेडे, तत्कालीन गटविकास अधिकारी जे. व्ही. मोडके, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर, जयश्री टेलरींग, शेख अहर, शेख समद या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, अवघ्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे, बंडू राठोड, अण्णा मानेबोईनवाड, मंगेश जुक्टे, श्याम काळे, अक्षय चौरे यांच्या पथकाने लेखापाल एस. के. पाठक, एम. बी. भिसे यांना ताब्यात घेतले.