Viral Photo Case Purna
पूर्णा : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खेडेगावात राहणाऱ्या काही समाजकंटक तरुणांकडून विद्यार्थिनींना छेडछाड, अश्लील वर्तन आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचे प्रकार वाढत आहेत. याचाच प्रत्यय पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी गावात आला असून एका तरुणाने विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून चुडावा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनगर टाकळी येथील १७ वर्षीय विद्यार्थिनी मागील काही दिवसांपासून शिक्षणासाठी गावातून पूर्णा येथे ये-जा करत होती. या दरम्यान आरोपी अर्जुन गंगाधर शेरकर (रा. धनगर टाकळी) याने वारंवार तिचा पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न केला व अश्लील हावभाव करत त्रास दिला. तसेच पीडितेचा फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉट्सॲपवर फेक आयडीच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप आहे.
याशिवाय २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साक्षीदाराच्या मोबाईलवर फोन करून धमकी व शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात २४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा क्रमांक ३००/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत नारमोड करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षण व सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.