Kharif 2025 Crop Insurance  Pudhari
परभणी

खरीप २०२५ पिकविमा भरपाई पीएमएफबीवाय पोर्टलवरून गायब; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची आशा मावळली?

पीएमएफबीवाय पोर्टलवर संबंधित विमाधारक शेतकऱ्यांच्या माहितीत ‘क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड’ असा उल्लेख

पुढारी वृत्तसेवा

Kharif 2025 Crop Insurance

पूर्णा : तालुका परिसरात खरीप हंगाम २०२५ मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पाणी शेतजमिनीत शिरून उभी पिके खरडून गेली, तर अनेक शेतांमध्ये दीर्घकाळ पाणी साचल्याने उत्पादनात मोठी घट झाली.

या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभाग आणि एआयसी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पीक कापणी प्रयोग राबविले. या प्रयोगांमध्ये सोयाबीनचे उंबरठा उत्पादन अत्यंत कमी आल्याचे समोर आले. त्याबाबतचे अहवाल कृषी विभागाने सुमारे दहा महिन्यांपूर्वी पीकविमा कंपनीकडे पाठविल्याचे सांगण्यात येते.

मात्र, पीक कापणी प्रयोगातून समोर आलेल्या उत्पादनाच्या आधारे नुकसानभरपाई देण्याऐवजी ग्रीन सॅटेलाइट तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे भरपाई देण्याची भूमिका विमा कंपनीने घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत तुटपुंजी भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, नुकसानभरपाईचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अधिकृत पीएमएफबीवाय पोर्टलवर संबंधित विमाधारक शेतकऱ्यांच्या माहितीत ‘क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड’ असा उल्लेख दिसत होता. मात्र, आता हा तपशीलही पोर्टलवरून हटविण्यात आला असून, त्याऐवजी ‘नो डेटा अव्हेलेबल’ असा संदेश दिसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पोर्टलवरील नुकसानभरपाईसंबंधी माहितीच उपलब्ध नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही पीकविमा भरपाईपासून शेतकरी वंचित राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पीकविमा कंपनी आणि प्रशासनाने याबाबत तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे शेतकऱ्यांना न्याय्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, पीकविमा भरपाईबाबत निर्माण झालेल्या या संभ्रमाचा परिणाम शेतकऱ्यांच्या पीकविमा योजनेवरील विश्वासावर झाला असून, चालू खरीप हंगाम २०२६ मध्ये या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT