शीतपेये आणि उसाचा रस यासारख्या थंड पेयांकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे  Pudhari
परभणी

Parbhani Heatwave | सूर्याचा तडाखा तीव्र; उकाड्याने जनजीवन त्रस्त, शीतपेयांकडे नागरिकांचा वाढता कल

तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत, उकाडा आणि कोरड्या वाऱ्यामुळे नागरिकांसह पशू-पक्षीही हैराण

पुढारी वृत्तसेवा

Purna summer temperature
आनंद ढोणे

पूर्णा : तालुक्यात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून, सध्या उष्णतेचा कडाका चांगलाच जाणवत आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सूर्य प्रखरतेने तळपत असल्याने वातावरण अत्यंत तापले आहे. दररोज तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असून, उकाडा आणि कोरड्या वाऱ्यामुळे नागरिकांसह पशू-पक्षीही हैराण झाले आहेत.

दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडत असून, जनावरे झाडांच्या सावलीत ठेवली जात आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक वारंवार थंड पाणी पित आहेत. तसेच विविध कंपन्यांची शीतपेये आणि उसाचा रस यांसारख्या थंड पेयांकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. दुपारच्या वेळी शीतपेय विक्री केंद्रांवर गर्दी होत असून, ठिकठिकाणी ऊसाच्या रसाच्या गाड्याही जोमात सुरू आहेत.

कडक उन्हामुळे शेतकरीही सकाळी आणि सायंकाळीच शेतीकामे करत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे काही जण झाडांच्या सावलीत विसावा घेत आहेत, तर काहीजण घरात कुलरचा वापर करून उकाड्यापासून बचाव करत आहेत. दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांकडून उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येत आहेत.

आणीबाणीचा इशारा जारी
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर २९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, असा इशारा देण्यात आला आहे. तापमान ४५ ते ५५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

घरात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. दही, ताक यांसारखे थंड पेयांचे सेवन वाढवावे. गॅसची उपकरणे, लायटर, बॅटरी किंवा कार्बनयुक्त वस्तू वाहनात ठेवणे टाळावे. वाहनाच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात आणि प्रवास शक्यतो टाळावा.

श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अचानक अस्वस्थ वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, गॅस सिलेंडर उन्हात ठेवू नये आणि विजेच्या वापरावरही नियंत्रण ठेवावे. अत्यंत उष्णतेच्या काळात एसी २४ ते २५ अंशांवर ठेवावा आणि दर २-३ तासांनी विश्रांती घ्यावी. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत थेट सूर्यप्रकाश टाळणे अत्यावश्यक आहे.
- डॉ. लक्ष्मण नाईक, वैद्यकीय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT