पूर्णा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बैलगाडी व जनावरांसह आमरण उपोषण सुरू  Pudhari
परभणी

Purna Farmers Protest | बंद शेतरस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांचे बैलगाडीसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

पूर्णा तालुक्यातील ताडकळस-महातपुरी येथील शेतकऱ्यांची बंद करण्यात आलेला पर्यायी शेतरस्ता तातडीने खुला करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Purna Hunger Strike

पूर्णा : तालुक्यातील ताडकळस-महातपुरी येथील शेतकऱ्यांनी बंद करण्यात आलेला पर्यायी शेतरस्ता तातडीने खुला करून देण्याच्या मागणीसाठी बुधवार (ता. ४ जून) पासून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बैलगाडी व जनावरांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनात मोहन होणमने, जनार्धन आंभोरे, पुणूबाई होणमने, सरुबाई चव्हाण, सुनिता आंभोरे, सुरेखा आंभोरे, सीमा गाढवे, बालासाहेब चव्हाण, शेख इस्माईल, त्र्यंबक आंभोरे आणि अशोक गाढवे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत.

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ताडकळस-महातपुरी शेतशिवरस्त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत तत्कालीन तहसीलदारांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतगटातून धुरे-बांधावरून पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला होता. मात्र, हा पर्यायी रस्ता अलीकडेच बंद करण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्यांचा शेतात जाण्या-येण्याचा मार्गच बंद झाला आहे.

रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी महसूल प्रशासनाकडे अनेकवेळा तोंडी पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून मशागतीची कामे करण्यासाठी शेतात जाणे आवश्यक आहे. मात्र रस्त्याअभावी शेतीची कामे ठप्प होण्याची वेळ आली आहे.

शेती हाच उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असल्याने रस्ता बंद राहिल्यास पेरणीसह शेतीची सर्व कामे अडचणीत येणार आहेत. परिणामी कुटुंबाच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, न्याय मिळविण्यासाठी नाईलाजाने अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT