Purna Market coriander price 200 per kg
पूर्णा: पूर्णा येथील भाजी बाजारात सध्या भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. कोथिंबीर तब्बल २०० रुपये किलो, तर मेथीची जुडी २० रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे ग्राहक आणि गृहिणी यांच्यात आश्चर्य आणि नाराजीचे सूर उमटले आहेत. अनेकजण “अरे बापरे! पूर्णेत कोथिंबीर दोनशे रुपये किलो?” असे म्हणतच बाजारातून परतत आहेत.
यंदाच्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. शेतकऱ्यांच्या मते, सध्या कोथिंबीरचा ठोक भाव १२० रुपये किलो आहे, तर किरकोळ विक्रेते ती १० रुपये छटाक या दराने विकत आहेत.
सध्या बाजारात येणारी कोथिंबीर आणि मेथी ही सरीवरंबा किंवा पॉलिहाऊसमध्ये पिकवलेली आहे. अतिवृष्टीत बहुतेक पालेभाज्या आणि फळभाज्यांचे नुकसान झाल्याने उत्पादन मर्यादित राहिले आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.
सध्या वांगी, हिरवी मिरची, वालशेंगा, गवार, चवळी, पालक आणि कारले यांसारख्या भाज्यांचे दरही ८० ते १०० रुपये किलो इतके आहेत. हिवाळ्यात भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्यानंतर दर कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, वाढत्या दरांमुळे सामान्य ग्राहकांचे बजेट मात्र बिघडले आहे. अनेकजण आता महाग भाजीपाला टाळून तुरीच्या आमटीवरच भागवताना दिसत आहेत.