पूर्णा: पूर्णा तालुक्यातील शेतशिवारात यंदाच्या रब्बी हंगामात टाळकी ज्वारी, गहू, हरभरा ही पिके जोमात बहरली आहेत. त्यामुळे पिकांचे बंपर उत्पादन होण्याचा अंदाज शेतकरी वर्गांतून वर्तवला जात आहे. रब्बी हंगामात टाळकी ज्वारी ८१७५.९६, गहू ६३००.८५ तर हरभऱ्याची ९६५४.१८ हेक्टवर पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी दिली. (Parbhani Rabi Crops)
यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहिला. बागायती बरोबरच कोरडवाहू शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीनंतर मशागत करुन त्या क्षेत्रात टाळकी ज्वारी व हरभरा पिकाची पेरणी केली. भरपूर ओलाव्यामुळे पिकांची उगवणशक्ती चांगली होऊन पीक वाढीस लागले आहे. यातच मध्यंतरीच्या काळात एक मोठा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे आणखीच जमिनीतील ओलावा कायम राहिल्याने पिके तरारून आली. (Parbhani Rabi Crops)
सध्या पहिल्या फेरीच्या टाळकी ज्वारीस कणसे लगडली असून ती हुरडा ज्वारी भरण्याच्या अवस्थेत आहेत. त्याचबरोबर बोअरवेल व विहिरीच्या पाण्यावर पेरणी केलेले आणि भरपूर थंडीच्या पोषक वातावरणामुळे गहू जोमात आला आहे. त्यामुळे ज्वारी, हरभरा आणि गव्हाचे यंदा बंपर उत्पादन होण्याची चिन्हे दिसत आहेत. जनावरांना ज्वारीचा चारा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून यावर्षी ज्वारी, गहू, हरभरा विक्रीतून शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे मिळणार आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (Parbhani Rabi Crops)