पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा पंचायत समिती कार्यालयातील (Purna Panchayat Samiti) लेखा विभागात कर्मचारी व काही खाजगी व्यक्तींनी संगनमत करुन भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन व अन्य देयकापोटी खोटी बिले सादर करुन १ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरामुळे पंचायत समितीत खळबळ उडाली आहे. (Parbhani News )
या प्रकरणी पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी एस. के. पाठक, वरिष्ठ सहाय्यक एम. बी. भिसे, तत्कालीन बीडीओ एस. के. वानखेडे, तत्कालीन गटविकास अधिकारी जे. व्ही. मोडके, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर, जयश्री टेलरींग, शेख अहर, शेख समद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani News )
पूर्णा पंचायत समितीच्या लेखा विभागात काही शासकीय निवृत्त कर्मचारी, निवृत्त शिक्षक यांना दिल्या जाणाऱ्या भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतन निधीत लेखा परीक्षणात १ कोटी ८३ लाखांचा अपहार दि. १ ऑक्टोबर २०२१ ते दि. १ मे २०२३ या कालावधीत झाल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबतचे वृत्त 'दै. पुढारी' मध्ये प्रकाशित झाले होते. परंतु, जिल्हा परिषद व इतर संबंधित तत्सम खात्याचा चौकशी अहवाल समोर आला नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, अपहार प्रकरणातील काही संबंधित कर्मचारी फरार झाले होते. आता गुन्हा दाखल झाल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.