Traffic Police  Pudhari
परभणी

Parbhani Police | अपघातांना ब्रेक लावण्यासाठी पोलिसांचा कडक ॲक्शन प्लॅन!

हेल्मेट, सीटबेल्ट, अतिवेग, मद्यधुंद चालकांवर विशेष कारवाई ; विना हेल्मेट पोलीस कर्मचाऱ्यांनाही एसपी कार्यालयात प्रवेशबंद होणार

पुढारी वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे नूतनीकरण झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढला असून, त्यातून अपघातांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे चित्र समोर आले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हेल्मेट, सीटबेल्ट, अतिवेग, मद्यधुंद वाहनचालक तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाभर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण ५२० रस्ते अपघात झाले. या अपघातांमध्ये २४४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. यंदाच्या वर्षातही परिस्थितीत सुधारणा झालेली नसून जुलै २०२६ अखेरपर्यंत ३२९ अपघातांमध्ये १७० जणांना जीव गमवावा लागला. सात महिन्यांपूर्वीच मृतांचा आकडा १७० वर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली.

पोलीस विभागाने केलेल्या अपघातांच्या विश्लेषणातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बहुतांश अपघात हे दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर न करणे, चारचाकी चालकांनी सीटबेल्ट न लावणे, वाहन अतिवेगाने चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच वाहतूक नियमांचे अज्ञान किंवा जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करणे या कारणांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे आता जिल्हाभरात वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या, सीटबेल्ट न लावणाऱ्या, वेगमर्यादा ओलांडणाऱ्या तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलन, दंड तसेच आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नियमभंगाबाबत कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जिल्ह्यातील सर्व वाहनचालकांना आवाहन करताना सांगितले की, रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दुचाकी चालविताना चालकासह मागील व्यक्तीनेही हेल्मेट घालणे, चारचाकीत प्रवास करताना सर्वांनी सीटबेल्ट लावणे, वेगमर्यादेचे पालन करणे आणि मद्यप्राशनानंतर वाहन चालविणे टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

काही क्षणांचा निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो, त्यामुळे नियमांचे पालन करूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन केले. दरम्यान, पोलीस विभागाने स्वतःपासून आदर्श घालून देण्याचाही निर्णय घेतला. परभणी पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले. विना हेल्मेट कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. अशा कर्मचाऱ्यांच्या वाहनावर तात्काळ ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, या नियमभंगाची नोंद संबंधितांच्या सेवापुस्तकात करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात वाढत्या अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पोलिसांनी आता झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दयामाया न दाखविता कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT