परभणी : समाजात दहशत निर्माण करून दादागिरी करणाऱ्या, वारंवार गुन्हे करणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी परभणी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन जरब’ मोहिमेचा प्रभाव दिसत आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या संकल्पनेतून सुरू या विशेष प्रतिबंधात्मक मोहिमेच्या दुसऱ्या आठवड्यातही जिल्हाभर पोलिसांनी धडक कारवाई केली. शनिवारी (दि.८) स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी ९४ सराईत व संशयित आरोपींना बोलावून त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांना वर्तनात सुधारणा करण्याची सक्त ताकीद दिली.
नागरिकांना सुरक्षित, निर्भय आणि कायद्याचे अधिराज्य असलेले वातावरण मिळावे, या उद्देशाने ‘ऑपरेशन जरब’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. दि. १ ऑगस्टनंतर दि. ८ ऑगस्ट रोजी मोहिमेचा दुसरा टप्पा संपूर्ण जिल्ह्यात राबविला. या कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये पोलिसांची जरब निर्माण झाली असून, त्यांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
सराईतांची पोलीस स्टेशननिहाय माहिती संकलित
मोहिमेअंतर्गत प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत समाजासाठी धोका ठरू शकणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली. समाजात दहशत निर्माण करणारे, दादागिरी करणारे, वारंवार गुन्हे करणारे, सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, तडीपार व्यक्ती, गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर असलेले आरोपी तसेच स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकणाऱ्या व्यक्तींची ओळख पटविण्यात आली.
या व्यक्तींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि सध्याच्या हालचालींचा आढावा घेण्यात आला. भविष्यात कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. ऑपरेशन जरबच्या माध्यमातून आतापर्यंत २०० हून अधिक सराईत व संशयित आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली. नागरिकांना धमकावणे, दादागिरी करणे, शांततेचा भंग करणे अथवा बेकायदेशीर कृत्य करण्यापासून दूर राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या.
पोलिसांनी केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी संभाव्य गुन्हेगारी प्रवृत्तींवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यास मदत होणार आहे. दि. ८ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून ९४ सराईत व संशयित आरोपींना बोलावण्यात आले. त्यांची चौकशी करून त्यांच्या वर्तनात सुधारणा करण्याबाबत कठोर शब्दांत तंबी देण्यात आली. यापुढे नागरिकांना त्रास देणे, धमकावणे, दादागिरी करणे किंवा शांततेचा भंग करणारे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्याऐवजी संबंधित व्यक्तींच्या पुढील हालचालींवरही पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर आणि गंभीर गुन्ह्यांतील जामिनावर असलेल्या आरोपींकडून पुन्हा गुन्हे घडू नयेत, यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. ऑपरेशन जरबच्या माध्यमातून परभणी पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना स्पष्ट संदेश दिला. दादागिरी, धमकी, दहशत अथवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूच राहणार आहेत. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन जरब’ ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून सराईत गुन्हेगारांवर सातत्याने वचक ठेवण्यासाठी नियमितपणे राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करणे आणि समाजात कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आपल्या वर्तनात सुधारणा करावी; अन्यथा पोलिसांच्या कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट आणि थेट इशारा ‘ऑपरेशन जरब’च्या माध्यमातून देण्यात आला आहे.