सेलू : शहरातील पोलीस स्टेशन येथे ७ मे रोजी नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन, सेलू पोलीस स्टेशन व परिसराची पाहणी केली. परिसरातील अस्वच्छतेच्या कारणामुळे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची तोंडी आदेशाने तात्काळ परभणी येथील नियंत्रण कक्षात बदली केली.
देशातील तथा राज्यातील कोणतेही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालय स्वच्छ असावे, अशी सर्व सामान्य नागरिकासह त्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची अपेक्षा असणे चुकीचे नाही. संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कार्यालय व परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. इतपत सर्व काही योग्य व बरोबर असल्याची जाणीव होते. मात्र कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा त्याचे जे काम आहे, त्यात कसूर करता कामा नये. हीच भावना व सर्वसामान्य माणसांमध्ये आजही कायम आहे.
ज्या त्या कार्यालयातील ज्या त्या अधिकाऱ्याने कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. तसेच भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येकांना न्याय देणे उचित आहे. अगदी याच प्रमाणे सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी पदभार स्वीकारल्यापासून, आज तागायत तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालून सेलू शहरासह तालुक्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
शिक्षणाचे माहेरघर तथा सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेलुकारांनी त्यासाठी प्रतिसाद दिला. शेलू शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणून ,त्यावर अंकुश ठेवण्यासाठी शहरासह तालुक्यात कार्यवाही करत राहणे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, ही दक्षता पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी आवर्जून पाळली होती. त्यांनी शहरातील शांतता अबाधित करण्यासाठी कायम प्रयत्न कले .तसेच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा मतदार संघ असलेल्या सेलू तालुक्यात सत्ताधारी व विरोधकांचे समाधान होईल अशी कायदा सुव्यवस्था ठेवण्याचा ते सतत प्रयत्न करत होते. मात्र अचानकपणे ,नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांनी सेलू पोलीस ठाण्याला भेट देऊन, केवळ स्वच्छतेचे कारण पुढे करून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची तोंडी आदेशान्वये तडकाफडकी परभणीतील जिल्हा नियंत्रण कक्षात बदली केली. त्यामुळे सेलू शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना अतिव दुःख झाले. नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गुन्हेगारी व कायदेविषयक कारणानुसार पोलीस निरीक्षक यांच्या बदलीचे आदेश काढले असते तर, शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक दुखावले नसते. मात्र स्वच्छतेचे कारण देउन तडकाफडकी तोंडी आदेशानुसार बदली झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकापुढे पोलीस निरीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची? की पोलीस स्टेशन व परिसर स्वच्छ ठेवायचा? हाच प्रश्न समोर उभा राहिला आहे. त्यामुळे यापुढे पोलीस निरीक्षक? की स्वच्छता निरीक्षक? असा गोंधळ सर्वसामान्य नागरिकासमोर उभा आहे. असेच म्हणावे लागेल.