Child Marriage Pudhari
परभणी

Child marriage parbhani news | जिल्ह्यात बालविवाहाविरुद्ध पोलिसांनी रणशिंग फुंकले

१२ विशेष पथके सज्ज ; गावागावात कडक नजर, माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त

पुढारी वृत्तसेवा

परभणी : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, बालविवाह विरोधात व्यापक आणि आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत तब्बल १२ बालविवाह प्रतिबंध पथके स्थापन करण्यात आली असून, ही पथके गावागावात सतर्कतेने कार्यरत राहणार आहेत.

सदर पथकांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ कायद्याचा धाकच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करून बालविवाह रोखण्यावर भर दिला जाणार आहे. ही पथके गावातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवणार असून, विशेषतः पाणी भरण्याची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे आणि संशयास्पद हालचाली दिसणाऱ्या भागांवर नजर ठेवली जाणार आहे.

कुठेही बालविवाह होण्याची शक्यता दिसताच तात्काळ हस्तक्षेप करून तो रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी (दि.१९) पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारवाई राबविण्यात येणार असून, त्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात ही पथके अधिक सतर्क राहणार आहेत. बालविवाहासंबंधी कोणतीही माहिती मिळताच त्वरित कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विशेष दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून, माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे.

बालविवाहास प्रोत्साहन देणारे, त्यासाठी मदत करणारे तसेच विवाहासाठी जागा उपलब्ध करून देणारे मंगल कार्यालय किंवा हॉल मालक यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. एकंदरीत, परभणी जिल्ह्यात बालविवाहाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेली ही आक्रमक भूमिका केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT