परभणी : तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ८ हजार रुपये स्वीकारताना सोनपेठ पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. शुक्रवारी (दि. ६) गंगाखेड येथील निळा फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली. भगवान विठ्ठल मुंढे असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे.
गंगाखेड येथील एका ७० वर्षीय गोशाळा चालकाच्या मुलीला काही इसमांनी अश्लील शिवीगाळ करून गोशाळेतून गाय व वासरे जबरदस्तीने नेली होती. याप्रकरणी पीडितेने सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी बीट जमादार भगवान मुंढे यांच्याकडे होती. या चौकशीत मदत करण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी मुंढे याने १० हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने याप्रकरणी एसीबीकडे धाव घेतली. २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत १० हजारांची मागणी निष्पन्न झाली, मात्र तडजोडीनंतर ८ हजार रुपये देण्याचे ठरले. शुक्रवारी गंगाखेड-परळी रोडवरील एका रसवंती गृहावर सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष ८ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने मुंढे याला झडप घालून पकडले.
कारवाईदरम्यान आरोपी हवालदाराची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला उपचारासाठी संदर्भाकित (Refer) करण्यात आले असून, सध्या त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा पवार व त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जप्त मुद्देमाल:
रोख ८ हजार रुपये (लाचेची रक्कम)
मोबाईल, पोलीस ओळखपत्र आणि ६५० रुपये रोख.
आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.