Palam Taluka Snakebite Death incident
पेठशिवणी : पालम तालुक्यातील पेठ शिवणी पासून चार किलोमीटर अंतरावर असलेले शेख राजूर येथे एका सर्पमित्राचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सर्पमित्राला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, मात्र ते निष्फळ ठरले.
प्राप्त माहितीनुसार, शेख राजूर येथील रहिवासी असलेले मृत विकास भारत कदम (वय २६) हे एक अनुभवी सर्पमित्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते सर्प पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करत होते. त्यांच्या या कार्यामुळे परिसरात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. १५ ऑगस्ट रोजी त्यांना एका घरात साप शिरल्याची माहिती मिळाली. तात्काळ ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सापाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. याच वेळी, अचानक सापाने त्यांच्या हाताला दंश केला.
सर्पदंशानंतर त्यांना तातडीने पालम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, मन्यार जातीचा विषारी सर्प असल्यामुळे सर्पविष शरीरात वेगाने पसरल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. अधिक उपचारांसाठी त्यांना नांदेड येथील श्री शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. नांदेड येथे ही डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
मात्र, उपचारादरम्यानच त्यांची ३१ ऑगस्ट रोजी तीनच्या दरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण आहेत त्यांच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता शेख राजुर येथील त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आले. परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली आहे.