परभणी : सुभाष कच्छवे
जिल्ह्यात आजघडीला महायुतीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण पहायला मिळत असून महायुतीमध्ये सारेच काही अलबेल नसल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी आ. विजय भांबळे यांच्यातील राजकिय वैर सर्वश्रुत असुन विजय भांबळेंच्या राष्ट्रवादी प्रवेशा नंतर बोर्डीकर-भांबळे यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणाचा कलगीतुरा नव्याने रंगला आहे.
दिड आठवड्यापुर्वी पुसद येथे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे समोरील भागात नाव असलेला दारूची वाहतुक करणारा आयशर टेम्पो पकडण्यात आला होता. तदनंतर दुसऱ्याच दिवशी माजी आ. विजय भांबळे यांनी परभणीत येवुन पत्रकार परिषद घेत मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यावर आरोप केले होते. बोर्डीकर भांबळे हा राजकिय वाद सर्वश्रुत असल्यामुळे भांबळे बोर्डीकरांवर आरोप करायला संधी मिळाल्यानंतर ती संधी दवडणार तरी कसे ? नुकतेच दोन दिवसापुर्वी बोरी येथील कार्यक्रमात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी ग्रामसेवकास कानशीलात लगावण्याची धमकी दिली होती.
प्रकरणाची माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर बोर्डीकर यांनी संबंधीत ग्रामसेवक हा सर्वसामान्य नागरीकांची कामे करत नाही. सामान्य नागरीक महिलांचे आर्थिक शोषन करतो असा खुलासा केला होता. हा वाद शमतो न शमतो तोच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांनी मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकल्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी रोहित पवारांना काही काम उरले नाही. त्यांना लवकर नेता बनण्याची घाई झाली आहे असा टोला लगावला होता. याही पुढे जावुन - आपल्या वक्तव्याचा अर्धवट व्हिडीओ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या माजी आ. विजय भांबळे यांनीच रोहित पवारांना पाठवला असे भांबळेंचा नामोल्लेख न करता म्हटले होते.
बोर्डीकरांच्या वक्तव्यानंतर कार्यकर्तेही संतप्त होवुन त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट टाकण्यास सुरूवात केली होती. भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी विजय भांबळे यांच्या नावाचा उल्लेख न करता नगरपालिका, मार्केट कमिटी हातातुन गेल्यामुळे भांबळे यांचा त्रागा होत असुन भांबळे हे रोहित पवारांना पुढे करुन पालकमंत्र्याच्या विरोधात कारस्थान करत असल्याचे म्हटले होते. रोहित पवार हे शरद पवार गटाचे आहेत कि अजित पवार गटाचे असाही प्रश्न उपस्थित केला होता. भाजपच्याच एका कार्यकत्याने दोन्ही ही राष्ट्रवादी म्हणजे एक छुपा दुश्मन आणि एक उघड दुश्मन असे वक्तव्य समाजमाध्यमावर केले होते. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण गती घेणार असल्याचे दिसते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही केलेली आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी युती नाही झाली तर आमची स्वबळाची तयारीही झाल्याचे स्पष्ट केल्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होऊ शकते.