परभणी

Parbhani news | एसटी चालकांच्या प्रसंगावधानाने दोन मोठ्या दुर्घटना टळल्या

MSRTC bus drivers alertness | परभणी–सोनपेठ मार्गावर शटल सेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोनपेठ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या परभणी–सोनपेठ मार्गावरील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठे अनर्थ टळले. एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे प्रवाशांनी सुटकेचा निस्वास सोडला असून बससेवेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परभणी बसस्थानकातून दुपारी ४ वाजता निघालेली एम.एच. १४ एल.एक्स. ७९६० ही बस सुमारे ९० प्रवासी घेऊन सोनपेठकडे जात होती. पोखर्णी गावाजवळील वळणावरील पुलाजवळ अचानक समोरील टायर फुटून धूर निघू लागला. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत बसचा वेग कमी करून सुरक्षितपणे बस थांबवली. त्यामुळे संभाव्य अपघात टळला; मात्र दुसरी बस येईपर्यंत प्रवाशांना सुमारे दीड तास प्रतीक्षा करावी लागली. त्याच दिवशी सकाळी ७ वाजता सोनपेठहून परभणीकडे निघालेल्या एम.एच. १३ सी.यू. ६८३८ या बसच्या चाकाच्या एक्सेलचे आठपैकी तीन नटबोल्ट निखळल्याचे चालकाच्या लक्षात आले. शेळगाव टेकडी चढावर येताना आणखी दोन नटबोल्ट निखळल्याचे दिसताच चालकाने बस तत्काळ थांबवून तपासणी केली. अवघ्या एका नटबोल्टवर बस धावत असल्याचे निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली.

परभणी–सोनपेठ मार्गावर दररोज सुमारे २८ फेऱ्या होतात. या मार्गावर २८ थांबे असून शिर्शी परिसरातील १८ ते २० गावे जोडली गेल्याने प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याने अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागतो. बस रद्द होणे, अस्वच्छ व मोडकळीस आलेल्या गाड्या यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

शटल सेवा सुरू करण्याची मागणी

सोनपेठ मार्गावर दर तासाला बस असली तरी ती अपुरी पडत असल्याने रात्री ९ वाजेपर्यंत शटल सेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. परभणी आगाराला या मार्गावरून मोठे उत्पन्न मिळत असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. परभणी–पंढरपूर बससेवा बंद असून छत्रपती संभाजीनगरसाठी थेट बस नसल्याने लांब पल्ल्याच्या बस सुरू करून दर अर्ध्या तासाला सेवा द्यावी, अशीही मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT