विठूनामाच्या गजराने दुमदुमली प्रभावती नगरी file photo
परभणी

Parbhani News : विठूनामाच्या गजराने दुमदुमली प्रभावती नगरी

जिल्हाभरात आषाढीनिमित धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; गोपाल दिंडीत भक्ती, संस्कृती, सेवाभावाचा संगम

पुढारी वृत्तसेवा

Parbhani News: Prabhavati City Resounds with Chants of 'Vitthal'

परभणी, पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शहरासह जिल्हाभरात शनिवारी (दि. २५) भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम झाले. विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणाने संपूर्ण प्रभावती नगरी दुमदुमली. शहरातील प्रमुख मंदिरांत पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. यंदाही काढलेल्या भव्य गोपाल दिंडीने हजारो भाविकांना भक्तिरसात तल्लीन केले. दिंडीतील सजीव देखावे, संतांच्या वेशभूषेतील बाल वारकरी, झांज-टाळ-मृदंगाचा निनाद आणि लेझीम पथकांच्या तालावर संपूर्ण शहर विठूमय झाले होते.

आषाढीनिमित्त गुजरी बाजार येथील विठ्ठल-रुक्मिणीसह शहरातील विविध मंदिरांत अभिषेक, महापूजा, हरिपाठ, भजन, कीर्तन, नामस्मरण व आरती झाली. पहाटेपासूनच मंदिरात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि बालकांनी उपस्थिती लावली. विश्व हिंदू परिषदेने माळी गल्लीतील हनुमान मंदिरातून सकाळी ८ वाजता भव्य गोपाल दिंडी काढली. नारायण चाळ, अष्टभुजा देवी मंदिर, क्रांती चौक, गुजरी बाजार, शिवाजी चौक मार्गे विद्यानगर येथील माऊली मंदिरापर्यंत दिंडीत विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, महिला, युवक, वारकरी, नागरिक सहभागी होते. दिंडीतील आकर्षण ठरले ते संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या वेशभूषेतील बालकांचे सादरीकरण.

वारकरी परंपरा, संत साहित्य आणि समाजप्रबोधनाचे संदेश देणारे सजीव देखावे नागरिकांचे लक्ष वेधत होते. दिंडी मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. आषाढीचे औचित्य साधून शहरातील अनेक शाळांतही विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या संतांच्या वेशभूषा परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

दिंडी मार्गावर विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, सेवाभावी मंडळे आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने भाविकांसाठी फराळ, पिण्याचे पाणी, फळे व प्रसादाचे वाटप करण्यात आले. विशेषतः दिंडीत सहभागी बाल वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना फळे व अल्पोपहार देण्यात आला. यशस्वीतेसाठी विहिंपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, व्यापारी, नागरिकांनी परिश्रम घेतले.

गोपाळदिंडीत विद्यार्थ्यांचे स्वागत

परभणी आषाढी एकादशीनिमित्त गुजरी बाजार परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उपमहापौर गणेश देशमुख व त्यांच्या पत्नी कोमल देशमुख यांच्या हस्ते महापूजा व आरती झाली. नंतर मंदिर समिती ट्रस्ट अध्यक्ष सुधीर पाटील व नंदकुमार झरकर, हरिश कब्रुवार यांनी महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख व कोमल देशमुख यांचा सत्कार केला. त्यानंतर शहरातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य गोपाळ दिंडीचे महापौर व उपमहापौर यांनी स्वागत केले.

मनपाने दिंडीत सहभागी सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना महापौर सय्यद इकबाल व उपमहापौर गणेश देशमुख व कोमल देशमुख यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व राजगिरा लाडूंचे वाटप केले. यावेळी नगरसचिव विकास रत्नपारखी, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, लेखा विभागातील मनोज खानापूरकर, उमेश जाधव, डी. बी. देवकर, स्वच्छता निरीक्षक न्यायरत्न घुगे, मिलिंद गालफाडे, सुभाष खुणे, सुरेश कदम, मनपाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आषाढीच्या पावन पर्वानिमित्त महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख व आयुक्त नितीन नार्वेकर यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT