Gambling Pudhari
परभणी

Parbhani News | कुंभारी जत्रेत ‘तितली पत्ता’ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जुगारासाठी वापरला जाणारा ‘तितली पत्ता’ संचही पोलिसांनी जप्त केला

पुढारी वृत्तसेवा

मानवत : तालुक्यातील कुंभारी येथील जत्रेत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर मानवत पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. ‘तितली पत्ता’ नावाचा पैशावर चालणारा जुगार खेळविताना एकास रंगेहाथ पकडण्यात आले असून चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास कुंभारी येथील जत्रेत काही इसम पैशावर जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती मानवत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल उत्तमराव खिल्लारे यांच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांना पाहताच काही जण पळून गेले, तर नितीन साहेबराव चव्हाण (वय ३०, रा. कुंभारी तांडा) हा जागीच सापडला. तपासादरम्यान नितीन चव्हाण याच्या ताब्यातून रोख १ हजार ३१० रुपये जप्त करण्यात आले. यात १००, ५०, २० व १० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. तसेच जुगारासाठी वापरला जाणारा ‘तितली पत्ता’ संचही पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणात अशोक प्रकाश यमगीर, सुनील व्होरकटे (रा. बर्गी मोहल्ला, मानवत) व लखन राजेभाऊ चव्हाण (रा. कुंभारी तांडा) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, धार्मिक जत्रांमध्ये अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मानवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT