परभणी

Parbhani News : मानवतमध्ये खळबळ! हनुमान जयंतीच्या महाप्रसादावेळी मधमाशांचा हल्ला; ५० हून अधिक भाविक जखमी

पुढारी वृत्तसेवा

मानवत : हनुमान जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमादरम्यान मधमाशांनी (आग्या मोहळ) अचानक केलेल्या हल्ल्यामुळे मोठी धावपळ उडाली. या घटनेत सुमारे २५ ते ५० भाविक जखमी झाले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील पंचवटी कॉलनी येथील हनुमान मंदिरात बुधवार (ता. १) पासून कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार (ता. २) रोजी सकाळी हनुमान जयंती उत्सव उत्साहात पार पडला. मंदिरात विधिवत कलशारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी राजेश प्रभाकर अंबेकर व अनिल सुरेश चौधरी हे यजमान होते. त्यानंतर महामंडलेश्वर स्वामी हरीश चैतन्य महाराज यांचे हरिकीर्तन झाले.

हरिकीर्तनानंतर भाविक महाप्रसादासाठी बसले होते. पहिली पंगत संपल्यानंतर दुसरी पंगत बसण्याच्या तयारीत असतानाच, परिसरातील मधमाशांचे मोहोळ अचानक उठले आणि त्यांनी भाविकांवर हल्ला चढवला. मधमाशांचा मोठा थवा पाहताच परिसरात घबराट पसरली आणि भाविकांची सैरावैरा पळ काढताना मोठी ओढाताण झाली.

या घटनेत प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सुमारे २५ ते ५० भाविकांना मधमाशांनी दंश केला आहे. जखमींमध्ये देविदास शंकरराव साखरे (वय ४८), कल्याण राजाराम शिंदे (वय ३०) आणि पंचफुलाबाई भगवान सीताफळे (वय ४२) यांचा समावेश असून, त्यांच्यावर मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींवर खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच मानवत ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवून प्राथमिक उपचार करण्यात आल्यामुळे अनेकांना वेळेत मदत मिळाली.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे धार्मिक कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर प्रशासन व स्थानिक यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT