परभणी: शहर मनपा निवडणुकीसाठी प्रारंभीपासून राष्ट्रवादी काँग्रेस जोमात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत सर्वच्या सर्व 65 जागा लढवत आहेत. शिवसेना शिंदे गट व भाजपची युती फिस्कटल्याने हिंदू बहुल भागात मत विभाजनाची भीती नाकारता येत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही तब्बल 45 जागांवर उमेदवारी देत मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.
परभणी शहर मनपा निवडणुकीसाठी राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने मागील अनेक महिन्यांपासून तयारी चालवली होती. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रारंभी पासून स्वबळाची भाषा केली होती. मागील काही दिवसापासून शिवसेना शिंदे गट व भाजपा अशी युती होईल असे संकेत मिळाले होते. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनीही सेना-भाजप युती होणार असल्याचे स्पष्ट केले होते. शेवटच्या क्षणी ही युती फिस्कटल्यामुळे शिवसेना शिंदे गट मनपा निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे लढतो आहे.
2 लाख 62 हजार मतदार संख्या असलेल्या परभणी शहर मनपा मध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 57 पैकी 27 मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या यादीमध्येही 5 मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. हिंदू बहुल भागात सेना-भाजप युतीफिस्कटल्यामुळे येथे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन अटळ असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मनपा निवडणुकीसाठी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात तब्बल 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.
विसर्जित मनपामुळे सत्ताधारी असलेली काँग्रेस 28 जागांवर लढत असून काँग्रेस व उबाठा मध्ये 12 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेनेने 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. एकंदरीत सर्वच्या सर्व 65 जागा लढवणारी राष्ट्रवादी काँग्रेस मनपा निवडणुकीसाठी जोमात असल्याचे चित्र दिसून येत आहे.