मानवत: तालुक्यातील मुख्य रस्ता असलेल्या मानवत ते पाळोदी या रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यापासून संथ गतीने सुरु आहे. रोडच्या साईड पट्ट्या खोदून ठेवल्याने अपघाताच्या घटना वाढल्या असून या रोडवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सदरील रस्त्याचे काम लवकरात लवकर व दर्जेदार करावे अशी मागणी होत आहे.
मानवत ते पाळोदी या मुख्य रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून कामाच्या नावाखाली अक्षरशः 'अर्धवट रस्ते खोदून ठेवले तर काही ठिकाणी साईड पट्ट्या खोलच्या खोल खोदून ठेवत या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले. रोडच्या दोन्ही बाजूच्या कडेला मोठी खोल दरीसारखी स्थिती निर्माण झाली असून अपघात झाला तर थेट जीवाला धोका निर्माण होईल, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी खड्डे पडल्यामुळे या रोडवर धुळीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे श्वसनाचे आजार देखील होण्याची भीती पाळोदी रोडवरील व्यापारी बोलून दाखवत आहेत. त्यामुळे मानवत पाळोदी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकांची गैरसोय टाळावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे
तालुक्यातील मानवत - पाळोदी या रोडवर हत्तलवाडी, सावळी, बोंदरवाडी, सावरगाव, पाळोदी, पिंपळा, जंगमवाडी आणि परिसरातील अनेक गावे या रस्त्यावर ये-जा करत असतात. किंबहुना ही सर्व गावे या रस्त्यावर अवलंबून आहेत. परंतु गेल्या सहा महिन्यापासून मानवत पाळोदी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे आणि अर्धवट कामामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वाहतुकीला देखील मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना देखील या रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागते.
पाळोदी रस्त्यावर वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली असल्यामुळे आणि साईड पट्ट्या न भरल्यामुळे रोड देखील अरुंद झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहन खाली उतरवण्यासाठी वाहन चालकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच मानवत बस स्थानकापासून ते नागरजवळा फाट्यापर्यंत मोठे बाजारपेठ देखील झाली आहे. ग्रामीण भागातील अनेकांनी या रोडवर दुकाने सुरू केली आहेत. अशा परिस्थितीमध्ये या रोडवर धुळीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या धुळीमुळे पाळोदी रोडवरील व्यापाऱ्यांचे व्यावसायिक ठप्प पडत आहेत. त्यामुळे व्यापारी देखील त्रस्त झाले आहेत.
या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित गुत्तेदाराकडून हा रोड वेळेमध्येच आणि गुणवत्तापूर्ण रस्त्याचे काम करून घ्यावे असे मागणी नागरिकाकडून केली जात आहे. शिवाय या परिसरातील लोकप्रतिनिधीनी देखील लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.