परभणी

लाइटर गन आणि छरा गनच्या जोरावर दहशत माजवणारा इसम गजाआड

Parbhani News | पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : अग्निशस्त्रासारखी दिसणारी लाइटर गन व छरा गन कमरेला लावून गावात दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. विशाल नारायण डुमणे (रा. महातपुरी ता गंगाखेड) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलीस पथक अवैध शस्त्रांबाबत माहिती संकलित करत पेट्रोलिंग करीत असताना महातपुरी फाटा परिसरात गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विशाल डुमणे हा पिस्टलसारखी दिसणारी शस्त्रे बाळगून ती खरी असल्याचा बनाव करत आहे. तसेच त्याचे फोटो काढून व्हॉट्सअॅप स्टेटस, डीपी आणि विविध ग्रुपवर प्रसारित करून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने महातपुरी फाटा येथील पांडुरंग हॉटेलजवळ सापळा रचून संबंधित इसमास ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लाकडी ग्रीप असलेली पिस्टलसदृश छरा गन व एक पिस्टलसारखी दिसणारी लाइटर गन जप्त करण्यात आली.याबाबत आवश्यक परवाना अथवा कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने कोणतीही कागदपत्रे नसल्याचे सांगितले. सदर इसम हा बनावट शस्त्रांच्या आधारे स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चंदन परिहार, पोलीस अंमलदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, पोलीस शिपाई शरद सावंत, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रेवार, गजानन शिरसागर, चालक हनवते व सायबर सेलचे गणेश कोटकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT