परभणी

Parbhani news | लासिना कालव्याला पाणी सुटले; सुकणाऱ्या ऊस पिकाला मिळाले जीवदान

'दै. पुढारी'च्या वृत्ताची आणि शेतकऱ्यांच्या मागणीची पाटबंधारे विभागाकडून तात्काळ दखल

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा: तालुक्यातील पांगरा लासिना, मरसूळ, सुहागन, देगाव, गोविंदपूर, पिंपळा लोखंडे आणि चुडावा येथील रब्बी शेतशिवारात गेलेल्या येलदरी धरण पूर्णा प्रकल्पाच्या लासिना कालव्याला मागील दोन दिवसांपासून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पाण्याअभावी सुकून जाणाऱ्या ऊस पिकाला मोठे जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

...आणि ८ दिवसांसाठी पाणी पाळी सुरू झाली!

कालवा लाभक्षेत्रातील उभी ऊस पिके पाण्याअभावी सुकत चालली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी प्रशांत ढोणे, सरपंच गोविंदराव देसाई, आनंद ढोणे, अमोल ढोणे, संतोष ढोणे, सुनील इंगोले, माऊली भोसले आणि आनंदराव पारवे आदींनी ११ जून रोजी वसमत विभागाच्या पाटबंधारे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.

याच मागणीच्या अनुषंगाने १२ जून रोजी 'दै. पुढारी' मध्ये "लासीना कालव्याला पाणी सोडण्याची मागणी, पाणी पाळी बंद झाल्याने बागायती पिके संकटात; आंदोलनाचा इशारा" या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. शेतकऱ्यांची ही मागणी आणि 'दै. पुढारी'च्या वृत्ताची तात्काळ दखल घेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील आठ दिवसांसाठी पाणी पाळी सुरू केली आहे.

कापूस आणि हळद लागवडीलाही फायदा

पांगरा परिसरातील अनेक गावांच्या शिवारात येलदरी धरण लाभक्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाची लागवड झाली आहे. या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता असते. कालव्याला पाणी सुटल्यामुळे केवळ ऊस पिकालाच जीवदान मिळाले नाही, तर सरीवरील कापूस आणि हळद लागवडीसाठीही या पाण्याचा मोठा फायदा होत आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीही वेळोवेळी पाणी पाळ्या सोडून शेतकऱ्यांविषयी सकारात्मकता दाखवली आहे. आताही पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. गरुड आणि कालवा निरीक्षक मोरे यांच्या सहकार्याने अत्यंत वेगाने पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.

थकीत पाणीपट्टी भरणे अत्यावश्यक "बागायती पिकांच्या सिंचनासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार आमच्या पाटबंधारे विभागाने रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये आवश्यकतेनुसार कालव्याला पाणी पाळ्या सोडल्या आहेत. आता जून महिन्यातही मोठा पाऊस झाला नसल्याने, पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून आम्ही तात्काळ पाणी सुरू केले आहे.""परंतु, लाभक्षेत्रातील असंख्य शेतकऱ्यांकडे पाणीपट्टीची मोठी थकबाकी प्रलंबित आहे. ही वसुली रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होत असून पाटबंधारे खाते आर्थिक डबघाईस जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचे गांभीर्य ओळखून आपली थकीत पाणीपट्टी त्वरित जमा करावी, असे आवाहन आम्ही करत आहोत."
— आर. पी. गरुड(कार्यकारी अभियंता, पूर्णा पाटबंधारे विभाग)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT