पूर्णा : देशासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या आद्यक्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचे मराठवाड्यात एकही स्मारक नसल्याची खंत उरी बाळगून, पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील एका तरुणाने आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. गोविंद ग्यानोजी कदम पाटील या युवकाने भगतसिंगांच्या भव्य स्मारकाच्या मागणीसाठी ३१ जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून, आज (दि. ३ ऑगस्ट) अन्नपाणी त्यागाचा चौथा दिवस उजाडला आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर कमालीची उदासीनता दिसून येत असल्याने या लढ्याची तीव्रता वाढत चालली आहे.
आज, ३ ऑगस्ट रोजी, त्यांच्या अन्नपाणी त्यागाचा चौथा दिवस असूनही स्थानिक व जिल्हा प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. ही मोठी खेदाची बाब मानली जात आहे. महसूल अधिकारी केवळ पोकळ आश्वासने देऊन उपोषण उठवण्याचा आणि आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत.
परंतु, शहीद भगतसिंग यांच्या विचारांनी आणि बलिदानाने प्रेरित झालेले युवक गोविंद कदम हे कोणत्याही आरोग्य तपासणीस किंवा उपचारास प्रतिसाद न देता ठामपणे आपला लढा पुढे नेत आहेत. त्यामुळे सोन्ना गाव शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या या चळवळीचे केंद्रबिंदू ठरू लागले आहे."देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही, मग माझा जीव गेला तरी बेहत्तर!" अशी तीव्र प्रतिक्रिया उपोषणकर्ते गोविंद कदम यांनी दिली आहे.
या प्रशासकीय दिरंगाईमुळे आता या आंदोलनाला राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून, "जर प्रशासनाने तातडीने या मागणीची दखल घेतली नाही, तर प्रहारच्या वतीने राज्यभरात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा पक्षाचे शिवहार सोनटक्के आणि विष्णू बोकारे यांनी दिला आहे.