मानवत : मानवत येथील गॅस एजन्सीकडून ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडरचा पुरवठा न करणे आणि प्रत्यक्षात सिलिंडर हातात न मिळताच ऑनलाइन नोंदींमध्ये तो वितरित झाल्याचे दाखवून दिशाभूल करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकाने तहसीलदारांकडे लेखी तक्रार नोंदवून सखोल चौकशीसह कारवाईची मागणी केली आहे.
मानवत येथील कोक्कर कॉलनीचे रहिवासी गणेश विठ्ठलराव गोरे यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी 'इंडेन' ॲपद्वारे ९६७.५० रुपये ऑनलाइन भरून गॅस सिलिंडर बुक केला होता. मात्र, अनेक दिवस उलटूनही त्यांना सिलिंडर मिळाला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्षात सिलिंडरचा पुरवठा झालेला नसतानाही इंडेन ॲपवर १ ऑक्टोबर २०२६ रोजी सिलिंडर वितरित (Completed) झाल्याची खोटी नोंद करण्यात आली.
या गैरप्रकाराबाबत गोरे यांनी ३ ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर रोजी कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी दाखल केल्या; मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. एजन्सीच्या या निष्काळजी व मनमानी कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्राहकाचे पैसे घेऊन प्रत्यक्षात सिलिंडर न देता परस्पर कागदोपत्री वितरण दाखवल्याप्रकरणी गोरे यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी मानवत तहसील कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत
१ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष सिलिंडर न देता डिलिव्हरीची नोंद कोणी व कोणत्या आधारे केली, याची डिजिटल पडताळणी करावी.
डिलिव्हरी ऑथेंटिकेशन आणि पावत्या तपासून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.
मानवत गॅस एजन्सीच्या मागील वितरण नोंदींची सखोल चौकशी करून इतर ग्राहकांचीही अशी फसवणूक झाली आहे का, याचा शोध घ्यावा.
या तक्रारीची प्रत अन्न व नागरी पुरवठा मंत्री, विभागीय आयुक्त (छत्रपती संभाजीनगर), जिल्हाधिकारी (परभणी), इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे विभागीय अधिकारी आणि ग्राहक पंचायतीकडेही पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता या गैरप्रकारावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या तक्रारीची दखल घेत मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.