पाथरी : शहरातील कचरा संकलनासाठी उभारण्यात आलेले डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे कचऱ्याने भरले आहे. शहरातून दररोज जमा होणारा कचरा थेट मुख्य रस्त्यावर टाकला जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. बाबुलतार रोडवरील या कचरा डेपो परिसरात सध्या दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून उघड्यावर कचरा जाळला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाथरी शहराची लोकसंख्या जवळपास ४० हजारांच्या आसपास असून शहरातून दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा घंटागाड्यांद्वारे बाबुलतार रोडवरील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येतो. मात्र मागील काही महिन्यांपासून हे डम्पिंग ग्राउंड कचऱ्याने ओसंडून वाहत असल्याने आता कचरा थेट रस्त्यालगत टाकला जात आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
उघड्यावर पडून असलेल्या कचऱ्यामुळे माशा, डास तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच उघड्यावर कचरा जाळण्यात येत असल्याने धूर आणि प्रदूषणात वाढ होत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, हा कचरा डेपो तातडीने शहराबाहेर स्थलांतरित करून तेथे शास्त्रोक्त प्रक्रिया केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर काँग्रेसचे गटनेते इब्राहिम अन्सारी यांच्यासह नगर परिषद सदस्य अन्सारी अब्दुल हातेम, राजेश पाटील, मो. कलिम अन्सारी, मो. इब्राहीम अन्सारी, अॅड. मलीक पटेल, रंगनाथ विरकर, मिलींद आठवे, नईम खान, अन्सारी आसेफोद्दीन आणि खुरेशी रज्जाक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.