Parbhani News 
परभणी

Parbhani News | गंगाखेड पंचायत समितीः अभियंत्यांना बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची; अन्यथा पगार कपात

पहिल्याच सर्वसाधारण सभेत सभापती मनोज मुंडे यांचा कडक निर्णय

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : गंगाखेड पंचायत समितीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रशासन शिस्तीत आणण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि कडक निर्णय घेण्यात आले. अभियंत्यांनी सकाळ-संध्याकाळ बायोमेट्रिक उपस्थिती लावणे बंधनकारक करण्यात आले असून, अनुपस्थिती आढळल्यास थेट पगार कपात करण्यात येणार असल्याचा इशारा सभापती मनोज मुंडे यांनी दिला.

सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी पार पडलेल्या या सभेला सभापती मनोज मुंडे, उपसभापती सौ सारिका खांडेकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. सभेमध्ये काही अभियंते ‘दौऱ्यावर’ असल्याचे सांगून कार्यालयातून बाहेर पडतात, मात्र पुन्हा हजेरी लावत नाहीत, अशी बाब निदर्शनास आली. यावर उपाय म्हणून दौऱ्यानंतर कार्यालयात परत येऊन बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणे तसेच कार्यालय सोडतानाही उपस्थिती लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय, कर्मचारी मोबाईल बंद ठेवत असल्याने नागरिकांची कामे प्रलंबित राहतात, या तक्रारींवरून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोबाईल सुरू ठेवून नागरिकांच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

बडवली गणातील विकास कामांबाबत सदस्य विजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करत, कामे करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याची गरज व्यक्त केली. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती सदस्यांशी समन्वय राखून काम करावे, अन्यथा संघर्ष वाढून कामकाजावर परिणाम होईल, असा इशाराही देण्यात आला.सभेच्या सुरुवातीलाच सर्व विभाग प्रमुखांची सदस्यांशी ओळख करून देण्यात आली.

पंधराव्या वित्त आयोगाच्या आराखड्यावर आक्षेप

प्रशासक काळात पंचायत समितीला मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा आराखडा प्रशासकानेच तयार केल्याने तो रद्द करून नवीन आराखडा तयार करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. यासाठी लवकरच विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असल्याची माहिती सभापती मनोज मुंडे यांनी दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT