परभणी : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या नियमबाह्य अन्नपदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या तपासणीत तब्बल ३ लाख ४७ हजार ४४० रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे भेसळखोर व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या या मोहिमेचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत परभणी जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.
या मोहिमेंतर्गत ३० मे रोजी परभणीतील वसमत रोड परिसरातील 'मे. किसान फूड्स' या बेकरी उद्योगाची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान बेकरीत तयार करण्यात येणाऱ्या टोस्टच्या पाकिटांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक असलेली माहिती व लेबलिंग आढळले नाही. तसेच, उत्पादन प्रक्रिया अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत सुरू असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे पथकाने चेरी टोस्ट आणि तीळ टोस्ट या उत्पादनांचा २८६ किलो वजनाचा व २८ हजार ८० रुपयांचा साठा जप्त केला.
यानंतर २ जून रोजी शहरातील कच्ची बाजार परिसरातील 'मे. मनियार ट्रेडर्स' या व्यापारी आस्थापनाची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुल्या स्वरूपात सोयाबीन तेल व पाम तेलाची विक्री होत असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा नियमांनुसार खुल्या तेलाची अशी विक्री करणे नियमबाह्य असल्याने, प्रशासनाने तेथील १ हजार ९९६ किलो वजनाचा आणि ३ लाख १९ हजार ३६० रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला.
या दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भेसळखोर, नियमबाह्य अन्नपदार्थ उत्पादक, विक्रेते आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील, असे सहायक आयुक्त अ. ए. चौधरी यांनी कळविले आहे. तसेच, जिल्ह्यातील नागरिकांनी दर्जाहीन, भेसळयुक्त अथवा संशयास्पद अन्नपदार्थांची माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, उन्हाळी विशेष मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या परभणी कार्यालयाने जिल्ह्यात विविध अन्नपदार्थांचे नमुने गोळा करण्याची मोहीमही हाती घेतली आहे. यामध्ये आंब्याचे चार नमुने, बर्फाचे दोन नमुने, तसेच आईस्क्रीम व फ्रोजन डेझर्टचे चार नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.
ही धडक कारवाई परभणीचे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) अ. ए. चौधरी तसेच छत्रपती संभाजीनगर येथील सहायक आयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे व तुषार घोपे यांच्या पथकाने केली.