परभणी : जिल्ह्यातील सोनपेठ, पूर्णा, परभणी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला बाधित शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असताना शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तात शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.
परभणी जिल्ह्यातील दीड हजार एकर जमीन संपादित करण्यात येणारा असून 31 गावे बाधित होणार आहेत. जुलै 2025 मध्ये शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध पाहता प्रशासनाच्या वतीने मोजणी स्थळी करण्यात आली होती, परंतु प्रशासनाने पुन्हा एकदा कडक पोलीस बंदोबस्तात शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी सुरू केली आहे. शुक्रवारी पहाटे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, सोनपेठ येथील शिवाजी कदम, सैफुल्ला सौदागर, दैठणा पोलीस ठाण्यात सतीश घाटगे, प्रसाद गोरे, दत्ता वाघ, गजानन गायकवाड व अन्य शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आल्या आहे.
शुक्रवारी भल्या पहाटे स्थानिक गुनाअन्वेषण शाखा व स्थानिक पोलीस ठाण्याच्या वतीने आंदोलक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. विविध प्रकल्पामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अगोदरच गेल्या असून पुन्हा शासन शक्तीपीठ मार्गासाठी जमिनी संपादित करत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. एकंदरीत शासनाच्या आठमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा विरोध फिका पडला आहे.