मानवत : शुल्लक कारणावरून शिवीगाळ, जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून शहरातील नगरसेवकाच्या भावास गंभीर जखमी केल्याप्रकरणी शनिवारी (दि.११) शहरातील फुले नगरातील ४ जणांविरुद्ध मानवत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बरसातसिंग बावरी, बलविंदरसिंग बावरी, भगतसिंग बावरी व आयासिंग बावरी (रा.फुले नगर) अशी आरोपीची नावे आहेत. ही घटना गुरूवारी (दि.९) शहरातील सोमाणी हॉस्पिटल समोरील मुख्य रस्त्यावर घडला होता.
भरधाव वेगातील मोटरसायकलस्वाराला गाडी कशी चालवतो? असे विचारले असता या कारणावरून शिवसेनेचे नगरसेवक अॅड. विक्रमसिंह दहे यांचे मोठे भाऊ अभयसिंह दहे यांना ४ जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार गुरूवारी (दि.९) सोमाणी हॉस्पिटल समोरील मुख्य रस्त्यावर घडला होता. मारहाणीमध्ये अभयसिंह दहे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.