परभणी : परभणी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याविरुद्ध (बीएलओ) तहसील प्रशासनाने कडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील शिस्त व जबाबदारीबाबत प्रशासनाचा कठोर संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मतदार यादीतील नावांचे अचूक मॅपिंग करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. २००२ मधील मतदार यादीतील नोंदींचे २०२४ च्या अद्ययावत यादीशी तंतोतंत जुळवाजुळव करणे ही या मोहिमेची मुख्य जबाबदारी आहे. मात्र, या संवेदनशील प्रक्रियेत नियुक्त करण्यात आलेले डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शाळेतील शिक्षक सय्यद फरहान सय्यद रहीम बी.एल.ओ.ने आपल्या कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचे समोर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित शिक्षकास मतदान केंद्र क्र. ९६/२२२ वर बी.एल.ओ. म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी १३ मार्च रोजी कर्तव्य स्वीकारले, मात्र त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात कोणतेही काम न करता निवडणूक विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. विभागाकडून वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काही वेळा त्यांचा मोबाईल बंद असल्याचेही आढळून आले. या प्रकारामुळे मतदार यादी पुनरीक्षणाच्या महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण झाला असून संबंधित मतदान केंद्रातील मतदारांच्या नोंदींच्या अचूकतेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ही बाब गंभीर स्वरूपाची मानत नायब तहसीलदार (निवडणूक) सुनील कांबळे यांनी तातडीने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० च्या कलम १३४ अन्वये संबंधित बी.एल.ओ. विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक कर्तव्यातील ही निष्काळजीपणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन मानून प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
दरम्यान, तहसील प्रशासनाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा आदेशाचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. निवडणूक कामकाजात सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावावे, अन्यथा अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल. या घटनेमुळे निवडणूक यंत्रणेतील शिस्तीचे महत्त्व अधोरेखित झाले असून, इतर कर्मचाऱ्यांसाठीही हा धडा ठरणार आहे.