ताडकळस: “पक्षाची विचारधारा हेच माझे जीवनसूत्र असून, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे,” असे ठाम मत भाजपा जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश सकनुर यांनी व्यक्त केले. पुर्णा तालुक्यातील वझूर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता संवाद मेळावा शनिवारी (दि. २४) सायंकाळी ५ वाजता कळगाववाडी (ता. पुर्णा) येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासोबत भाजपची युती झाल्यानंतर ऐनवेळी ऋषिकेश सकनुर यांची उमेदवारी पक्षाकडून रद्द करण्यात आली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी सकनुर यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना सकनुर म्हणाले, “मी हिंदुत्ववादी विचारसरणीतील सक्रिय कार्यकर्ता असून, पक्षाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे मला मान्य नाही. पक्षाने मला आयुष्यात खूप काही दिले आहे. एखादी उमेदवारी नाकारली म्हणजे अन्याय झाला असे होत नाही. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि संघटन मजबूत करणे हेच खऱ्या कार्यकर्त्याचे ध्येय असते.”
वझूर जिल्हा परिषद गटातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच अग्रेसर राहू, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार असून, पुढील काळात पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडू, असेही सकनुर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सर्वांनी जोमाने कामाला लागावे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार विजयी होतील, यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत.
या संवाद बैठकीस ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथराव भोसले, संचालक नंदकिशोर मुंदडा, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव बाळाराम माडकर, भाजपा जिल्हा सचिव विजय साखरे, जिल्हा चिटणीस डॉ. दिगंबर डोरनरपल्ले, माऊली शिंदे, भारत भोसले, रामराव देशमुख, शिवकुमार शिराळे, केशव होळपादे, मोतीराम पवार, राजू डीघोळे, चंद्रकांत पवार, भास्कर धोत्रे, हनुमान मंगनाळे, विठ्ठल जोगदंड, पांडुरंग शिंदे, तुकाराम दुधाटे, एकनाथराव हिंगे, माधव दुधाटे, विष्णू पोळ, बाळू बासटवार, सुभाषराव सूर्यवंशी यांच्यासह ताडकळस व परिसरातील कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.