Parbhani News : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा जलसमाधीचा एल्गार 
परभणी

Parbhani News : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा जलसमाधीचा एल्गार

विनोद आडे यांच्या उपोषणाला पाठिंबा; येलदरी जलाशयात शेकडो समाजबांधव उतरले

पुढारी वृत्तसेवा

जिंतूर : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे, तसेच जिंतूर येथील स्वर्गीय वसंतराव नाईक पुतळा परिसरात ५ सप्टेंबरपासून उपोषणास बसलेले विनोद आडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले.

एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी विनोद आडे यांचे जिंतूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घेऊन आरक्षणाच्या मागणीवर ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी समाजबांधवांकडून सातत्याने करण्यात येत आहे. १२ सप्टेंबर रोजीही जिंतूरमध्ये बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले होते. त्‍याचबरोबर दिनांक १६ सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते.

दरम्यान, आज करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.

आंदोलकांनी केलेल्या मागण्या

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय नोकरी: गेल्या एक वर्षामध्ये बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी प्राण गमावलेल्या मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदतीसह कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी.

एसटी प्रवर्गाचे लाभ तात्काळ लागू करणे: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत, सध्या अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील नागरिकांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी-सुविधा, सवलती आणि इतर लाभ बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना तात्काळ लागू करण्यात याव्यात.

मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक: शासनाने या उपोषणाची आणि आंदोलनाची गंभीर दखल घेऊन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या दालनामध्ये समाजाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवावे आणि बंजारा समाजाचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घ्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT