बोरी : येथून जवळ असलेल्या परभणी महामार्गावरील कोक गावात दूषित पाणी पिल्यामुळे विषबाधेची घटना घडली असून आतापर्यंत ८५ हून अधिक ग्रामस्थांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामस्थांना उलट्या, अतिसार, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदरील विषबाधेतील पहिला रुग्ण १३ ऑक्टोबर रोजी सकाळी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर दुपारी ८ रुग्ण आले होते, १४ ऑक्टोबर रोजी १८ रुग्ण, १५ ऑक्टोबर रोजी तब्बल ५१ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते यापैकी तीन गंभीर रुग्णांना परभणी येथे रुग्णालयात हलविण्यात आले. १६ ऑक्टोबर रोजी आणखी तीन रुग्णांची नोंद झाली होती अशी माहिती डॉ. बी.के.पवार यांनी दिली.
यातूनच बोरी ग्रामीण रुग्णालयात ७९ रुग्ण, परभणी जिल्हा रुग्णालयात ३, तर काही रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अद्याप काही ग्रामस्थ आजारी असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गावात मागील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या जुन्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात आला होता. विहिरीतील पाणी साचलेले, शेवाळयुक्त व पूर्णतः दूषित होते. हेच पाणी पिल्यामुळे अनेकांना विषबाधा झाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजयकुमार पांचाळ, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आबासाहेब जाधव व त्यांच्या पथकाने गावाला भेट देऊन पाहणी केली. सध्या गावात आरोग्य कॅम्प सुरु असून डॉक्टरांची टीम रुग्णांवर उपचार करत आहे. या घटनेमुळे गावात आरोग्याच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून, ग्रामस्थांनी स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.