परभणी/जिंतूर : जिंतूर तालुक्यातील वडाळी येथील शेतशिवारात मुक्कामी मेंढपाळाच्या कळपातील तब्बल ४४ मेंढ्यांचा शनिवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. काही वेळातच मोठ्या संख्येने मेंढ्या दगावल्याने मेंढपाळ कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्येही चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वडाळी येथील शेतकरी प्रकाश दुभाळकर यांच्या गट क्रमांक १७५ मधील शेतात पुणाजी समाधान येळे हे कुटुंबासह ३०० हून अधिक शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन मुक्कामी होते. नेहमीप्रमाणे कळपाची देखभाल सुरू असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास काही मेंढ्या अचानक आजारी पडल्याचे निदर्शनास आले. पाहता पाहता काही मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत मेंढ्यांची संख्या वाढत जाऊन तब्बल ४४ मेंढ्या दगावल्याचे स्पष्ट झाले.
एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने नेमके कारण काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विषबाधा झाली असावी, दूषित अथवा विषारी चारा खाल्ल्याने ही घटना घडली असावी किंवा एखाद्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, अधिकृत तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय मृत्यूचे निश्चित कारण सांगणे शक्य नसल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत मेंढ्यांची तपासणी केली. मृत मेंढ्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिंतूर ठाण्याचे सपोनि. इंगोले, मुजगुळे, पोलिस हवालदार दीपक वाटोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मोठ्या संख्येने पशुधन दगावल्याने घटनेची नोंद घेऊन परिस्थितीची माहिती जाणून घेण्यात आली. मेंढ्या हेच येळे कुटुंबाच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने ४४ मेंढ्यांचा अचानक मृत्यू हा मोठा आर्थिक धक्का मानला जात आहे.
एका दिवसात मोठ्या संख्येने पशुधन गमावल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे महसूल व पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे तातडीने पंचनामा करून शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. या घटनेचा वैद्यकीय अहवाल काय येतो, त्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, उर्वरित कळपातील शेळ्या-मेंढ्यांच्या आरोग्यावरही पशुसंवर्धन विभागाने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.