Parbhani News 
परभणी

Parbhani News | गोदावरीत बुडून १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

खाजगी हॉस्टेलमधून मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलावर काळाचा घाला

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : तालुक्यातील धारखेड शिवारातील गोदावरी नदीपात्रात बुडून १३ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रितेश राजेभाऊ कदम राहणार नरळद ता गंगाखेड (वय १३) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा गंगाखेड शहरातील एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होता. तो आपल्या तीन मित्रांसह कोणालाही न सांगता दि 6 एप्रिल रोजी दुपारी गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने नदीपात्रातून विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय, गंगाखेड येथे शवविच्छेदन करण्यात आले.दरम्यान, रितेश हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती असून, या घटनेमुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT