Parbhani Municipal Corporation Election
परभणी : परभणी शहर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी एकूण ६५ जागांसाठी तब्बल ४११ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १६२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अंतिम उमेदवारांची संख्या निश्चित झाली आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने काँग्रेससोबत आघाडी केली असून, बारा प्रभागांमध्ये उबाठा आणि काँग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आकाश बहिरट आणि देशमुख या दोन उमेदवारांनी अनपेक्षितपणे माघार घेतली. यासह अनेक प्रभागांमध्ये जोरदार तयारी करणाऱ्या उमेदवारांनीही माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर झाल्याची चर्चा असून, त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात प्रचार अधिकच रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.