परभणी : नूतन सभापतींच्या निवडीनतर महापौर स. इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नार्वेेकर आदी. pudhari photo
परभणी

Parbhani News : स्थायीसह विषय समिती सभापतीच्या बिनविरोध निवडी

भाजपची माघार अंतर्गत संर्घषातून की पराभवाच्या भीतीने..! : शिवसेनेला 6, काँग्रेसला 4, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 सभापतीपद

पुढारी वृत्तसेवा

परभणी : परभणी शहर महानगरपालिकेच्ाा स्थायीसह अन्य 10 विषय समित्यांची निवड बिनविरोध पार पडली. या निवडीमध्ये विषय समित्यांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. मनपामध्ये 12 सदस्य संख्या असलेल्या भाजपाने उमेदवारी अर्ज दाखल न करता सपशेल माघार घेतल्याचे दिसून आले. भाजपाने अंतर्गत संघर्षामुळे का निवडणूक लढवून नाचक्की होईल, म्हणून निवडणुकीतून माघार घेतल्याचे बोलले जात आहे.

परभणी शहर मनपातील भाजपामधील अंतर्गत संघर्ष यापूर्वीच उफाळून आल्याचे दिसलेलेच आहे. शनिवारी स्थायी समिती सभापती पदासह अन्य 11 समित्यांच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे होते. स्थायी समिती सभापती पदासाठी प्रतिमा सरोदे, प्रभाग समिती अ सभापती पदासाठी रईस खान सरफराज खान, प्रभाग समिती ब मुसदीक खान नुरुल्ला खान, प्रभाग समिती क तबस्सुम शेख, समाजकल्याण सभापती पदासाठी राजेश रणखांबे, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी अश्विनी जाधव, स्थापत्य समिती सायरा बेगम अलिमोद्दीन काजी, वैद्यकीय व आरोग्य समिती अबोली कांबळे, शहर सुधार समिती शुभांगी पाष्टे, पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती शमदा बेगम स. इलाही, विधी समिती रुकसाना बेगम अब्दुल हमिद जहागिरदार यांनी अर्ज दाखल केले होते.

शुक्रवारी बी. रघुनाथ सभागृहात स्थायीसह अन्य 11 समित्यांची निव्ाड बिनविरोध पार पडली. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काम पाहिले. यावेळी मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, नगरपालिका प्रशासन प्रमुख महेश गायकवाड, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची उपस्थिती होती. सर्व 11 विषय समित्यांची निवड बिनविरोध झाल्याचे महापौर स.इकबाल यांनी जाहीर केले. नूतन सभापतींचा महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख यांनी सत्कार केला.

भाजपची माघार का?

स्थायी समिती सभापतीपदासह 11 विषय समित्यांच्या निवडणुकीत 12 सदस्य संख्या असलेल्या भाजपाने माघार का घेतली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपाचे मनपातील काही नगरसेवक व महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. महानगर जिल्हाध्यक्ष भरोसे यांचा स्वीकृत सदस्यासाठीचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपाच्या मनपातील गटनेत्या तिरुमल्ला खिल्लारे यांची एकमेव उपस्थिती होती. अन्य भाजपा नगरसेवक सहकारी घटक पक्षाच्या नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते.

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना लेखी पत्र लिहून पक्षाच्या बैठकांना दांडी मारणाऱ्या व पक्षशिस्त मोडणाऱ्या नगरसेवकांवर कार्यवाहीची मागणी केली होती. विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपाने अंतर्गत संघर्षामुळे माघार घेतली की निवडणुक लढवून नाचक्की करून घेऊ नये म्हणून माघार घेतली, अशी चर्चा होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT