Parbhani Muncipal Election News
सुभाष कच्छवे
परभणी : शहर मनपाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाची अवस्था नमनालाच घडे या म्हणी प्रमाणे झाली आहे. भाजपावर सहा प्रमुख पद पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची नामुष्की ओढावली आहे. तसे आदेश महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी काढले आहेत.
नगरपालिका निवडणुकीत भाजपाला देदीप्यमान यश मिळाल्याबद्दल भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेत नगरपालिका निकाल हा उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था विजयाची नांदी असल्याचे म्हटले होते. कमळाच्या चिन्हावर जिंतूर नगरपालिकेत सहा नगरसेवक निवडून आल्यामुळे जिंतूर पॅटर्न परभणी मनपासह मराठवाडाभर राबविण्याचे त्यांनी संकेत दिले होते.
विसर्जित मनपामध्ये भाजपाचे ८ नगरसेवक होते. मनपाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा ४१ जागांवर लढत असून परभणी मनपा ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महानगर निवडणूक प्रमुख माजी आ. सुरेश वरपूडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे व पदाधिकाऱ्यांनी चग बांधला आहे. त्यादृष्टीने भाजपाने तयारीही सुरू केली आहे, मात्र ऐन निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच भाजपावर ६ प्रमुख पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची नामुष्की ओढवली आहे.
यामध्ये चक्क प्रदेश कार्यकारणी सदस्य, दोन विविध सेलच्या जिल्हाध्यक्षांचाही समावेश आहे. कुठल्याही निवडणुकीला सामोरे जाताना ती कार्यकर्त्यांच्या जीवावर एकसंघपणे लढवली जात असते, परंतु निवडणुकीच्या तोंडावर पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल व पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल करण्यात आलेली पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी म्हणजे भाजपामध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मनपा निवडणुकीची धुरा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व माजी आ. सुरेश वरपूडकर यांच्यावर सोपवली आहे. बहुसंख्य मुस्लिम मतदार असलेल्या परभणी शहर मनपामध्ये सत्ता मिळवणे हे भाजपासाठी एक आव्हान असणार आहे. भाजपाने प्रथमच मनपा निवडणुकीसाठी ५ मुस्लिम चेहऱ्यांना संधी देऊन मुस्लिम मतदार आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नाला कितपत यश मिळेल हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या उमेदवारांसाठी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभाही पार पडली. सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणीच्या विकासाबाबत आपण सकारात्मक असल्याचेही स्पष्ट केले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे हात बळकट करण्याचे आवाहनही केले.
प्रारंभीपासून स्वबळाची भाषा बोलणाऱ्या भाजपाने निवडणूक प्रक्रियेच्या तोंडावर शिव सेना शिंदे गटासोबत युती करण्याचे संकेत दिले. तदनंतर या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांची युती शेवटच्या क्षणी तुटली. युती तुटल्यानंतर एकमेकांवर आरोप करण्यात आले. भाजपसोबत काडीमोड झाल्यावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी ३५ जागांवर उमेदवार देत त्या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. स्वतः आनंद भरोसे प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांसाठी पायी प्रचार करताना दिसून येत आहेत.
हिंदुत्ववादी मतांचे होणारे विभाजन हे भाजपासाठी नुकसानदायक ठरू शकत असल्याचे वास्तव आहे. भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त, संघटनात्मक मर्यादा, पक्षाच्या अधिकृत निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केले आहे. यामुळे ताकदीने मनपा लढवू पाहणाऱ्या भाजपामध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. भाजपाची अवस्था नमनालाच घडे या म्हणी प्रमाणे झाली आहे.
कुठल्याही शुभकार्याच्या प्रसंगी शुभ संकेत मिळावेत असे अपेक्षित असताना भाजपाला मात्र आपल्या ६ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी लागली आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश देशपांडे, पदाधिकारी लक्ष्मीकांत क्षीरसागर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम मुदीराज, मंडळ अध्यक्ष स्वप्निल पिंगळकर यांचा समावेश आहे. हकालपट्टीचे आदेश महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी काढले आहेत.