Pudhari
परभणी

MP Sanjay Jadhav | खा. संजय जाधव यांच्या निर्णयाचे सोनपेठमध्ये जल्लोषात स्वागत; प्रतिमेला दुग्धाभिषेक

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयाचे सोनपेठ तालुक्यातील समर्थकांकडून उत्स्फूर्त स्वागत

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena Sanjay Jadhav Political Decision

सोनपेठ : परभणीचे खासदार संजय जाधव यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयाचे सोनपेठ तालुक्यातील समर्थकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येत खासदार जाधव यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून आपल्या समर्थनाची जाहीर अभिव्यक्ती केली.

सकाळपासूनच चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक जमा झाले होते. यावेळी त्यांनी खासदार जाधव यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दर्शवत घोषणाबाजी केली. जाधव यांनी जनतेच्या आणि मतदारसंघाच्या हिताचा विचार करूनच हा निर्णय घेतल्याचा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांच्या मते, या निर्णयामुळे तालुका आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल. खासदारांप्रती असलेली निष्ठा आणि विश्वास व्यक्त करण्यासाठी समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत जल्लोष साजरा केला.

"संजयभाऊ जाधव तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या प्रत्येक निर्णयामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

काल काही ठिकाणी झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज समर्थकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत केलेले शक्तीप्रदर्शन लक्षवेधी ठरले. या कार्यक्रमातून खासदार संजय जाधव यांच्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेला विश्वास आणि पाठिंबा पुन्हा अधोरेखित झाल्याचे दिसून आले. कार्यक्रमास तालुक्यातील असंख्य समर्थक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

खासदार संजय जाधव यांच्या प्रवेशाचे शिवसेनेकडून दुग्धाभिषेक करून स्वागत

पाथरी : परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पाथरी येथे शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सईद खान यांच्या नेतृत्वाखाली खासदार जाधव यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करण्यात आले.

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाप्रमुख सईद खान यांनी खासदार संजय जाधव यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचा दावा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात विविध पक्षांतील अनेक नेते आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेत सहभागी होत असल्याचे सांगत, आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असल्याचेही खान यांनी नमूद केले.

खासदार जाधव यांच्या प्रवेशाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पाथरी येथे झालेल्या स्वागत कार्यक्रमात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT