अजितदादांच्या निधनाने जिल्हा हळहळला pudhari photo
परभणी

Ajit Pawar death : अजितदादांच्या निधनाने जिल्हा हळहळला

परभणी : लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांच्या समाजमाध्यमांवर भावनिक पोस्ट

पुढारी वृत्तसेवा

परभणी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती नजिक बुधवारी (दि.28) सकाळच्या सुमारास विमान कोसळून अपघाती निधन झाल्याचे वृत्त धडकताच जिल्हाभर शोककळा पसरली आहे. अनेक लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकांनी समाज माध्यमांवर भावनिक पोस्ट करत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परभणी जिल्ह्याची स्नेह राहिलेला आहे. जिल्ह्यासाठीच्या विविध विकासकामांसाठी त्यांनी मोकळ्या हाताने निधीही दिलेला होता. बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामती नजीक कोसळून यात अजित पवारांचा मृत्यू झाल्याची बातमी जिल्हाभरात धडकताच जिल्ह्यावर शोककळा पसरली. लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिकांनी समाज माध्यमावर भावनिक पोस्ट करत अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्टेटसवर दादांचा फोटो दिसून येत होता.

सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला स्पष्ट वक्ता नेता अचानक काळाच्या पडद्याआड जावा, हे सर्वसामान्य नागरिकांना चटका लावून गेले आहे. सद्यस्थितीत अनेक शाळा, महाविद्यालयांचे स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम सुरू असून पवार यांच्या निधनाचे वृत्त येताच अनेक शाळा, महाविद्यालयांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. अजित पवार समर्थक पदाधिकारी व कार्यकर्ते बारामती येथे होणाऱ्या अंत्यविधीसाठीही रवाना झाले आहेत.

दरम्यान सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच या दु:खद घटनेने सर्वच राजकीय पक्षांतील उमेदवारांनी निधनाची बातमी समजताच प्रचार थांबविल्याचे पहावयास मिळाले.

लोकांच्या सुख दु:खात धावून जाणारा नेता : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे लोकांच्या सुख दुःखात कायम उभा राहणारा नेता होता. त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा साधेपणा, स्पष्ट बोलणं आणि लोकांशी असलेली आपुलकी दुर्मिळ होती, म्हणूनच ते फक्त नेते नव्हते तर लोकांचा आधार, विश्वास आणि प्रेरणा होते. आपण पहिल्यांदा विधिमंडळात पोहोचल्यानंतर अजित दादांनी आपुलकीने चौकशी करत चांगले काम करण्याचा सल्ला दिल्याची पोस्ट पालकमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी केली आहे.

हृदय पिळवटून टाकणारी बातमी : माजी आ.सुरेश वरपुडकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी हृदय पिळवटून टाकणारी आहे. अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. आपण अजित दादांसोबत काम केले असून दादांसारख्या परखड व खमक्या नेतृत्वाला नियतीने हिरावून घेतले आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र शोकसागरात बुडाल्याची पोस्ट माजी आ.सुरेश वरपूडकर यांनी केली आहे.

जिकडे-तिकडे दादाच!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली असून विविध समाज माध्यमांवर दादांच्या अपघाती मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करणाऱ्या पोस्ट दिसून आल्या. प्रत्येकाच्या व्हॉट्सॲप स्टेटसलाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच फोटो दिसून येत होता.

व्यक्तिगत जीवनातील आधारस्तंभ हरपला : आ.राजेश विटेकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे. दादांच्या जाण्याने आपल्या व्यक्तिगत जीवनातील आधारस्तंभ गेल्याची भावनिक पोस्ट आ.राजेश विटेकर यांनी समाज माध्यमांवर टाकली आहे. अजित दादांचे जाणे ही केवळ एका व्यक्तीची हानी नसून महाराष्ट्राच्या प्रगतशील वाटचालीतील एक मोठे पर्व संपल्याचे आ.विटेकर यांनी म्हटले आहे.

वेळ पाळणारे दादा अवेळी कसे गेलात : आ.डॉ.राहुल पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे वेळेचे पक्के होते. कुठल्याही कार्यक्रमाला ते अगदी दिलेल्या वेळेवर पोहोचायचे. त्यामुळेच त्यांचा वक्तशीरपणा अनेकांना भावला जायचा. वेळ पाळणारे दादा अवेळी कसे निघून गेले, आता आम्ही कामासाठी कोणाकडे जायचे अशी भावनिक पोस्ट आ.डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे

महाराष्ट्र प्रभावी लोकनेत्याला मुकला : माजी आ.सुरेश देशमुख

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. एका ज्येष्ठ आणि प्रभावी लोकनेत्याच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया माजी आ.सुरेश देशमुख यांनी शोकसभेत दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT